नाशिकमध्ये दोन गटात राडा, दोन गटातील तुंबळ हाणामारी पोलीस ठाण्यात, कोणत्या कारणावरून राडा ?
ज्या दोन गटात हाणामारी झाली ते दोन्हीही कुटुंबात माजी नगरसेवक आहे. आणि ज्यांच्या हॉटेलमध्ये हाणामारीच्या दरम्यान तोडफोड झाली ते तक्रारदार हॉटेलमालकही माजी नगरसेवक आहे. त्यामुळे अधिकच चर्चा होऊ लागली आहे.
नाशिक : नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या ( Nashik News ) हद्दीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. बॅनरबाजीवरुन हा राडा झाल्याचे समोर आले आहे. नाशिकच्या उत्तम नगर परिसरात ( Nashik Cidco ) हा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही गट हे एकाच पक्षातील आहे. शिवजयंती आणि महाशिवरात्रीच्या बॅनर लावण्यावरून वाद झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात या हाणामारीची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. रात्री उशिरापर्यन्त अंबड पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या गटातील पदधिकाऱ्यांनी तक्रार देण्यासाठी धाव घेतल्याने सिडको परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्या दोन गटात हाणामारी झाली ते दोन्हीही कुटुंबात माजी नगरसेवक आहे. आणि ज्यांच्या हॉटेलमध्ये या हाणामारीच्या दरम्यान तोडफोड झाली ते तक्रारदार हॉटेलमालकही माजी नगरसेवक आहे. त्यामुळे अधिकच चर्चा होऊ लागली आहे.
नगरसेविकेच्या पुत्राने हॉटेलमध्ये तोडफोड केली आहे. खरंतर माजी नगरसेविकेचा पुत्र आणि नगरसेविकेचा पती यांच्यात हा वाद झाला आहे. रात्री उशिरा शिवजयंती आणि महाशिवरात्रीचा फलक लावण्यावरुन बाचाबाची झाली होती.
माजी नगरसेविका रत्नमाला राणे यांचा मुलगा सचिन राणे आणि माजी नगरसेविका शीतल भामरे यांचे पती संजय भामरे यांच्यात वाद झाला होता. खरंतर हे दोघेही एकाच पक्षात असले तरी त्यांच्यात मोठा संघर्ष आहे.
काही महिन्यांपूर्वी यांच्यातील वाद मिटवण्यात आला होता. मात्र मनातील कटुता अद्यापही कायम असल्याचे या वादानंतर समोर आले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगूजर यांनी मध्यस्ती केली होती.
आता नुकताच राडा झाल्याने हा वाद सोडविण्यासाठी मध्यरात्री सुधाकर बडगूजर यांनी धाव घेतली होती. अंबड पोलीस ठाण्यात याबाबत स्वतः बडगूजर यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.
दरम्यान राणे आणि भामरे यांच्यातील वादाच्या दरम्यान उत्तमनगर परिसरात मोठी गर्दी झाली होती. याच वेळी रहदारीच्या रस्त्यावरच हा राडा झाल्याने वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती.
एक दिवसावर शिवजयंती आल्याने स्टेजबांधून बॅनर लावण्याची लगबग पाहायला मिळत आहे. त्यासाठी राणे आणि भामरे यांच्याकडून जागेवरून हा वाद सुरू झाला होता. नंतर थेट बॅनरवरुण हा वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा राडा पाहता अंबड पोलीसांनी बंदोबस्त वाढवला आहे. याच दरम्यान दोन्ही गटाला यावेळी सूचना देण्यात आल्या असून पोलिसांची भूमिका यावेळी महत्वाची ठरणार आहे.