“सॉरी, कोरोना व्हॅक्सिन असल्याचं माहित नव्हतं” चिठ्ठी लिहून माफी, चोरलेले शेकडो डोस परत
अवघ्या बारा तासात सिव्हील लाईन ठाण्याबाहेर असलेल्या चहावाल्याकडे चोराने हे डोस परत केले. (Corona Vaccine Thief Haryana Note)
गुरुग्राम : हरियाणातील सिव्हील हॉस्पिटलमध्ये चोरीचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. चोराने रात्रीच्या वेळेस कोरोना लसीचे शेकडो डोस चोरले. मात्र गुरुवारी सकाळीच पोलिस स्टेशनबाहेर बसलेल्या चहावाल्याला सर्व डोस परत केले. विशेष म्हणजे लसीसोबत त्याने एक चिठ्ठीही दिली. “सॉरी, कोरोना व्हॅक्सिन असल्याची माहिती नव्हती” असा भाबडा माफीनामा चोराने चिठ्ठीत लिहिला. (Sorry Did Not Know Its Corona Vaccine Thief In Haryana Returns Covid Vaccine With Note)
जिंदचे पोलीस उपायुक्त जितेंद्र खटकड यांनी याविषयी माहिती दिली. बुधवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सिव्हील हॉस्पिटलमधून चोराने कोरोना लसीचे शेकडो डोस चोरीला गेले. मात्र अवघ्या बारा तासात सिव्हील लाईन ठाण्याबाहेर असलेल्या चहावाल्याकडे चोराने हे डोस परत केले.
चहावाल्याकडे लसीचे डोस सुपूर्द
चहाच्या दुकानात बसलेल्या वृद्धाकडे चोराने लसीचे डोस सुपूर्द केले. ठाण्याच्या मुंशींसाठी खाद्यपदार्थ आहेत, असा निरोप देऊन चोरटा पसार झाला. वृद्ध पोलिस स्थानकातील कर्मचाऱ्यांकडे ती पिशवी देऊन गेला. त्यामध्ये कोविशील्डच्या 182 वाइल, तर कोवॅक्सिनचे 440 डोस होते. पिशवीत एक चिठ्ठीही होती. तिच्यात ‘सॉरी मुझे पता नहीं था कि ये कोरोना की वैक्सीन है’ (सॉरी, कोरोना व्हॅक्सिन असल्याची माहिती नव्हती) असं लिहिलं होतं.
50 हजारांची रोकड तशीच
चोराने रेमडेसिव्हीर इंजेक्शन चोरण्याच्या नादात कोरोना लशी चोरल्या असाव्यात, असा संशय डीएसपी जितेंद्र खटकड यांनी व्यक्त केला. चोरांनी एका कपाटात ठेवलेल्या काही कागदपत्रांच्या फाईल्सही लंपास केल्या आहेत. परंतु तिथेच ठेवलेली 50 हजारांची रोकड तशीच ठेवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
कोरोना लसीसाठी सुरक्षा व्यवस्था नाही
पोलिसांनी कलम 457 आणि 380 अंतर्गत अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. रुग्णालयातील सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे. कोरोना लसीसाठी कुठलीच सुरक्षा व्यवस्था ठेवलेली नाही. जानेवारी महिन्यात जेव्हा लसीचे पहिले डोस आले, तेव्हा दहा दिवस पोलीस कर्मचारी तैनात होते. मात्र त्यानंतर कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही.
कोरोना लशी 12 तासांपेक्षा अधिक काळ फ्रीजबाहेर राहिल्याने वापरण्यास निरोपयोगी झाल्याचा अंदाज आहे. याविषयी सिव्हील सर्जननी मुख्यालयाकडून गाईडलाईन्स मागवल्या आहेत.
संबंधित बातम्या :
रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार तेजीत, मुंबईसह नागपूर पोलिसांची कडक कारवाई
दूध चोरीसाठी पुण्यात भलताच फंडा, रिक्षातून येणाऱ्या चोरट्याकडून साडे पाचशे लिटर दूध लंपास
(Sorry Did Not Know Its Corona Vaccine Thief In Haryana Returns Covid Vaccine With Note)