पानिपत : थंडी लागली म्हणून हिटर लावून झोपलेल्या स्पा सेंटरमधील सफाई कर्मचाऱ्याचा गुदमरुन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना हरियाणातील पानिपतमध्ये घडली आहे. मात्र मयताच्या कुटुंबीयांनी त्याची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. जॉनी असे मयत सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळाची तपासणी केली असता हा अपघाती मृत्यू असल्याचे दिसते. मात्र पोलीस अधिक तपास करत आहेत.
पानिपत शहरातील हायप्रोफाईल परिसर अंसल येथे हे स्पा सेंटर आहे. या स्पा सेंटरमध्ये जॉनी हा सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. नेहमीप्रमाणे जॉनी गुरुवारी स्पा सेंटरमध्ये आपल्या ड्युटीवर गेला होता.
सध्या हिवाळा सुरु असल्याने सकाळी प्रचंड थंडी लागत असल्याने जॉनीने स्पा सेंटरमधील हिटर सुरु केला आणि झोपी गेला. हिटरमुळे जवळच असलेल्या सोफ्याला आग लागली. आगीमुळे स्पा सेंटरमध्ये सर्वत्र धूर पसरला.
धुरामुळे जॉनीचा श्वास गुदमरला. झोपेत असल्याने त्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी बाहेर पडता आले नाही. यामुळे घुसमटल्याने त्याचा दुर्दैवी मृ्त्यू झाला.
जॉनीचा मृत्यू श्वास गुदमरल्यामुळे झाला नसून, त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची तपासणी केली असता आतमधील बरेचसे सामान जळालेले दिसले. यावरुन जॉनीचा मृत्यू श्वास घुसमटल्यामुळेच झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.