सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढताय? मग ही बातमी वाचाच, अन्यथा तुम्हालाही चढावी लागेल कोर्टाची पायरी
नशामुक्त शहर करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहिम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत आता रस्त्यावर उभं सिगारेट ओढणंही महागात पडणार आहे.
डोंबिवली : गेल्या काही दिवसांपासून नशामुक्त शहर करण्यासाठी पोलीस अॅक्शन मोडवर आले आहेत. यासाठी पोलीस प्रशासनाकडून विविध मोहिम राबवली जात आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली पोलिसांनी विशेष मोहिम राबवली आहे. सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारची नशा करणाऱ्यांविरोधात पोलीस अॅक्शन मोडवर आली आहे. रस्त्यावर कुठेही उभं राहून सिगारेट ओढणाऱ्यांनाही आता चाप बसणार आहे. अशी कोणत्याही नशा करणाऱ्यांना थेट कोर्टात उभं केलं जाणार आहे. डोंबिवलीत या कारवाईची सुरवात केली आहे.
आता नशा करणाऱ्यांना थेट कोर्टात नेणार
कल्याण झोन 3 चे डीसीपी सचिन गुंजाळ आणि डोंबिवलीचे एसीपी सुनील कुऱ्हाडे यांनी डोंबिवली परिसरातील डोंबिवलीतील रामनगर, विष्णुनगर, टिळक नगर आणि मानपाडा पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार या चारही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी विविध पथकं नेमत कारवाईची सुरवात केली.
या कारवाईत बीट मार्शल आणि परिसरामध्ये पोलिसांची व्हॅन पाठवत कारवाई सुरू केली. विशेषतः स्टेशन परिसर, बस स्टॉप, ओपन जीम, बगीचे किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही सिगारेट ओढताना, तंबाखू खाताना किंवा कोणतेही अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळल्यास त्यांना पोलीस ठाण्यात नाही तर थेट कोर्टात जावं लागणार आहे.
दोन तासात 50 जणांवर कारवाई
सदर नशा करणाऱ्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात येणार आहे. यानंतर न्यायालय आरोपीला काय शिक्षा द्यायची ते निर्णय घेणार आहे. कारवाईच्या पहिल्याच दिवशी दोन तासात 50 लोकांवर सार्वजनिक ठिकाणी सिगारेट, तंबाखू सेवन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली, तर अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.