Bombay High Court : संशयावरून प्रेयसीची चाकूने भोसकून हत्या; प्रियकराच्या जन्मठेपेवर हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब
आरोपी गिरी याने प्रेयसी समंथाची हत्या केली. गिरीला समंथाच्या वर्तणुकीवर संशय आला होता. त्याच संशयावरून त्याने तिची चाकूने भोसकून हत्या केली. तिचा मृत्यू झाल्यानंतर गिरीने आधी स्वतःला दुखापत करून घेतली. त्यानंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.
मुंबई : प्रेयसी (Girlfriend)वर संशय घेऊन तिची चाकूने निर्घृण हत्या (Murder) करणाऱ्या प्रियकरा (Boyfriend)ला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या जन्मठेपेवर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. 2008 साली ही घटना घडली होती. प्रेयसीची हत्या केल्यानंतर मारेकरी प्रियकराने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. एका हॉटेलच्या खोलीत आरोपीने हे कृत्य केले होते. त्याने 20 वर्षांच्या प्रेयसीची हत्या केल्याप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तथापि, आरोपीला कुठलाही दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.
मृत तरुणीच्या शरीरावर जखमांच्या 19 खुणा
आरोपी गिरी याने प्रेयसी समंथाची हत्या केली. गिरीला समंथाच्या वर्तणुकीवर संशय आला होता. त्याच संशयावरून त्याने तिची चाकूने भोसकून हत्या केली. तिचा मृत्यू झाल्यानंतर गिरीने आधी स्वतःला दुखापत करून घेतली. त्यानंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मृत तरुणीच्या शरीरावर जखमांच्या 19 खुणा होत्या. यावरून आरोपी गिरी याने प्रेयसी समंथा हिची हत्या करण्याचा कट रचल्याचे स्पष्ट होते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती पीबी वराळे आणि न्यायमूर्ती एस.डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठाने आपल्या निकालात ही निरीक्षणे नोंदवत आरोपीच्या जन्मठेपेवर शिक्कामोर्तब केला आहे.
गिरीने शिक्षेत सूट मिळवण्यासाठी न्यायालयात आपला जोरदार बचाव केला. सामंथाचा मी जवळचा मित्र होतो. किंबहुना मी तिच्याशी लग्न करणार असल्याचेही तिला सांगितले होते. तिला मारण्यासाठी माझ्याकडे कुठलेच कारण नव्हते, असे सांगून गिरीने या प्रकरणात मी निर्दोष असल्याचा कांगावा केला. हॉटेल मालकाच्या सांगण्यावरून आपल्याला या खोट्या प्रकरणात गोवण्यात आल्याचे गिरीने सांगितले. दुसरीकडे फिर्यादी प्राजक्ता शिंदे यांनी सांगितले की, आरोपी गिरीला समंथाच्या चारित्र्यावर संशय होता. त्याच संशयातून त्याने बंद खोलीत समंथाची चाकूने भोसकून हत्या केली. ही हत्या म्हणजे पूर्वनियोजित कट असल्याचाही दावा शिंदे यांनी न्यायालयात केला. गिरीने शस्त्रसज्ज होऊनच हत्येचा प्लॅन केला होता, असेही त्यांनी सांगितले.
2012 मध्ये सुनावली गेली होती जन्मठेपेची शिक्षा
फिर्यादीने सादर केलेल्या पुराव्यांतून हत्येतील गिरीचा सहभाग उघड होत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले. गिरीने आपल्यावर आणि त्याच्या मैत्रिणीवर तीन अज्ञातांनी हल्ला केल्याचा युक्तिवाद केला. मात्र हा युक्तिवाद मान्य करण्यासही न्यायालयाने नकार दिला. मे 2012 मध्ये सत्र न्यायालयाने गिरीला खून आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. सत्र न्यायालयाचा तो निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे.
2008 साली घडली होती घटना
फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, 20 मार्च 2008 रोजी पीडित समंथा फर्नांडिस आणि गिरी हे नवी मुंबईतील रबाळे येथील हॉटेलच्या खोलीत सापडले होते. पोलिसांनी जखमी समंथाला रुग्णालयात नेले होते, तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर गिरी शुद्धीवर आला आणि नंतर त्याला अटक करण्यात आली. हायकोर्टाने दोषी गिरीचे अपील फेटाळून लावत जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवली आहे. फिर्यादीने सादर केलेले पुरावे स्पष्ट आहेत. त्यावरून आरोपीचा गुन्हा सिद्ध होतो, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. (Stabbing his girlfriend to death on suspicion life imprisonment confirm by High Court)