PFI चे दोघे पुन्हा पोलिसांच्या ताब्यात, मालेगावात ‘अशी’ झाली कारवाई
मालेगावमध्ये मागील आठवड्यात पीएफआयचे पदाधिकारी असलेले मौलाना सैफुर रहमान यांना मालेगाव येथील हिडको मधून पहाटे ताब्यात घेत अटक केली होती.
नाशिक : देशभरातील विविध शहरामध्ये पीएफआय (PFI) संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यामध्ये आत्तापर्यंत केंद्रीय तपास यंत्रणेकडून कारवाई केली जात होती. त्यातच पुण्यातील (PUNE) पीएफआय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने राज्यातील पीएफआय च्या पदाधिकाऱ्यांची चौकशी राज्य पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) माध्यमातून चौकशी केली जात आहे. मालेगाव शहरातील पीएफआय संघटनेशी संबंधित असलेल्या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये पीएफआयचे माजी अध्यक्ष मोहम्मद इरफान दौलत नदवी, रशीद शहदैन शहीद इकबाल यांना चौकशी साठी ताब्यात घेण्यात आले आहे.
मालेगावमध्ये मागील आठवड्यात पीएफआयचे पदाधिकारी असलेले मौलाना सैफुर रहमान यांना मालेगाव येथील हिडको मधून पहाटे ताब्यात घेत अटक केली होती.
याच दरम्यान राज्यातील विविध शहरांमधून 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यांना न्यायालयात हजर करत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटणेकडून देशात धोका असल्याचा अलर्ट देण्यात आलेला होता. या संघटनेचे देशभरात 3 लाखांहून अधिक फॅमिली अकाऊंट आहे.
समाजात वैर वाढवणे, बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि कट रचल्याबद्दल चार गुन्हे दाखल करण्यात आले होते.
त्याच पार्श्वभूमीवर अटक केलेल्या संबंधित व्यक्तींपैकी पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी राज्य पोलीस प्रतिबंधात्मक म्हणून कारवाई करत आहे.
राज्यातील विविध शहरात राज्य पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने ही कारवाई केली जात असून आज पहाटे पासूनच या कारवाईला राज्य पोलीसांनी सुरवात केली आहे.