नाशिक : उन्हाळा सुरू झाला की बहुतांश नागरिक हे घराच्या बाहेर किंवा गच्चीवर झोपतात. गरमीपासून काहीसा दिलासा मिळेल यासाठी ते बाहेर झोपत असतात. मात्र, हीच संधी पाहून नाशिकच्या सिडकोमधील रहिवाशी भीतीच्या वातावरणात ( Nashik Crime News ) आहे. दरवर्षी पोलिस याबाबत सूचनाही देत असतात. त्याचे कारण म्हणजे काही वर्षांपूर्वी सिडकोतील घरांच्या गच्चीवर झोपणाऱ्या नागरिकांचे मोबाइल चोरी होण्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये उन्हाळा सुरू झाला की ती एक भीती असते. मात्र, आता नुकताच एक प्रकार समोर आला आहे. सिडकोतील ( Cidco ) चौकाचौकात आठ दिवसांत दोन घटना घडल्या आहे. घरांवर दगडफेक करत नागरिकांना घरात घुसून शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा नवा प्रकार समोर आला आहे.
नाशिकच्या सिडको परिसरात दोन वेगवेगळ्या भागात सारखेच प्रकार समोर आल्याने यंदाच्या वर्षीही गच्चीवर झोपायला जावे की नाही असा प्रश्न पडत आहे. सिडकोतील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
नाशिकच्या सिडको परिसरात आठ दिवसांत दोन घटना घडल्या आहेत. त्यामध्ये नागरिकांच्या घरांजवळ येऊन गुंडाची टोळी जोरजोरात आरडाओरड करते. त्यानंतर नागरिकांच्या घरांवर दगडफेक करते. इतकंच काय कोणी दरवाजा उघडून विचारपुस करायला गेल्यास त्यांना बेदम माराहण केली जातात. रात्रीच्या वेळीचा प्रकार धक्कादायक आहे.
विशेष म्हणजे तोरनानगर परिसरात राहणाऱ्या घोरपडे कुटुंबाने विचारणा करताच त्यांना घरात घुसून शिवगाळ करत मारहाण केल्याने एक पुरुष आणि महिला गंभीर जखमी झाले आहे. घोरपडे कुटुंब या घटनेने हादरून गेले आहे. परिसरातील वाहनांची मोठी तोडफोड केली आहे.
अशीच काहीशी घटना राणा प्रताप चौकातही घडली होती. त्यामध्येही घरांवर दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली होती. एकूणच उन्हाळ्यात गच्चीवर झोपलेले नागरिक असावेत म्हणून घरांवर दगडफेक केली जात असल्याची चर्चा सिडको परिसरात आहे. त्यामुळे या गुंडांचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे.