बैलगाडा शर्यत सुरु असतानाच ‘ती’ अफवा पसरली, लोकांकडून स्टेजवर दगडफेक
गोंदियात इनामी शंकरपट कार्यक्रमावेळी तरुणाच्या मृत्यूची अफवा पसरल्याने दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 52 लोकांवर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोंदिया / शाहिद पठाण : गोंदिया जिल्ह्याचा सडक अर्जुनी तालुक्यातील केसलवाडा येथे इनामी शंकरपटाला गालबोट लागल्याची घटना घडली. बैलगाडा शर्यत सुरु असताना एका तरुणाच्या मृत्यूच्या अफवेमुळे दगडफेकिची घटना घडली आहे. लोकांनी स्टेजवर दगडफेक केली. या गर्दीला पांगविण्यासाठी आलेल्या डुग्गीपार पोलिसांच्या वाहनावर देखील दगडफेक करण्यात आली. तसेच पोलीस वाहनाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्यात 52 लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तरुणाच्या मृत्यूची अफवा पसरल्याने दगडफेक
विदर्भातील मोठ्या इनामी शंकरपटाचे आयोजन केसलवाडा येथे करण्यात आले होते. हा शंकरपट पाहण्यासाठी परिसरातील शेकडो नागरिकांनी आणि पटशौकिनांनी प्रचंड गर्दी केली होती. ही गर्दी पांगविण्यासाठी पटसमितीचे अध्यक्ष राजकुमार हेडाऊ यांनी काठीचा वापर केला. यात चंद्रहास परशुरामकर या तरुणाच्या डोक्यावर काठी लागल्याने यात त्याचा मृत्यू झाल्याची अफवा पसरल्याने वातावरण तापले.
विविध कलमान्वये 52 लोकांवर गुन्हा दाखल
यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी पटसमितीच्या स्टेजच्या दिशेने दगडफेक सुरू केली. या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचे वाहन आले असता, त्या वाहनावरही दगडफेक करून त्या वाहनाचे 5 हजार रूपयाचे नुकसान केले. शेवटी पट बंद करावा लागला. दरम्यान पोलीस हवालदार हरिश्चंद्र पंढरी शेंडे यांच्या तक्रारीवरून 52 लोकांवर डुग्गीपार पोलिसांनी भादंविच्या कलम 143, 144, 145, 147, 149, 186, 353, 427, सहकलम सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3, सहकलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे या पटाच्या फायनल मध्ये 7 लाख रुपयाचे संपूर्ण बक्षीस असल्यामुळे शेवटच्या जोड्या सुटण्याची वाट पाहत असताना नागरिकांनी एकच गर्दी केली होती. यादरम्यान हा प्रकार घडला आहे.