इंदूर | 20 जानेवारी 2024 : मध्य प्रदेशातील इंदूर येथे असलेल्या अनाथाश्रमातील मुलींनी तेथील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. येथे 4 ते 16 वयोगटातील मुलींनी जेव्हा आपबिती सांगितली, ते ऐकून पोलिसही हैराण झाले. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या घटनेत एक-दोन नव्हे तर तब्बल 21 मुलींना क्रूरपण वागणूक देऊन त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. या मुलींचे कपडे उतरवून, उलटं लटकवून त्यांना लोखंडी चिमट्याने भाजण्यात आलं. क्रूरतेचा हा कळस गाठतानाच त्या मुलींना लाल मिरचीची धुरीही देण्यात आली. अनाथ बालिकांना मायेचं छत्र मिळावं म्हणून सुरू केलेलं हे वात्स्यपुरम् होतं पण तेथील छळ पाहता त्याचं नान वात्सल्यपुरम् नव्हे तर वासनापुरम् असायला हवं होतं.
त्या मुलीच्या तोंडून अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसही हेलावले. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे इंदूर पोलिसांनी अनाथाश्रमातील चार कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस गांभीर्याने तपास करत आहेत.
21 मुलींनी लावले आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, इंदूरच्या अनाथाश्रमातील कर्मचाऱ्यांनी अत्याचार केल्याचा आरोप 21 मुलींनी केला आहे. त्या मुलींचे कपडे काढून त्यांना लोखंडी चिमट्याने भाजण्यात आलं. त्यांना उलटं टांगून लाल मिरचीची धुरही देण्यात आली. हैवान शब्दही लाजेल, कमी पडेल अशा प्रकारचं कृत्य त्या कर्मचाऱ्यांनी मुलींसोबत केलं. 13 जानेवारी रोजी बाल कल्याण समिती (CWC) च्या टीमने इंदूरमधील वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या अनाथाश्रमात अचानक तपासणी केली होती. यानंतर धक्कादायक खुलासा झाला.
अनाथाश्रमातील मुलींनी जेव्हा अधिकाऱ्यांना आपला त्रास सांगितला तेव्हा ते अवाक् झाले, हैराण झाले. 21 मुलींच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या चार कर्मचार्यांवर बाल न्याय कायदा आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल करून कारवाई सुरू
मुलींनी त्यांच्या जबानीत छेडछाडीची माहिती दिली आहे, असे इंदूरचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी सांगितले. या आधारे पोलिसांनी वात्सल्यपुरम जैन ट्रस्टच्या कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयुषी, सुजाता, सुमन, आरती आणि बबली अशी आरोपींची नावे आहेत.
अनाथाश्रमात राहणाऱ्या मुली वेगवेगळ्या जिल्ह्यातील आहेत. तपासणीत या मुलींवर अत्याचार झाल्याचे आढळून आले. आम्ही या प्रकरणाचा व्यापक तपास सुरू केला आहे. CWC अहवालानंतर योग्य कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे, असे इंदूरचे जिल्हाधिकारी आशिष सिंह यांनी सांगितले.