पुणे – पुण्यातील (PUNE) वेल्हा (VELHE) तालुक्यातील लव्ही गावात, तरुणाच्या छेडछाडीला कंटाळून एका युवतीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सानिका रेणुसे असं त्या तरूणीचं नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस (POLICE) स्टेशन मध्ये आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल अविनाश रेणुसे या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अविनाशला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वारंवार छेडछाड आणि फोन करून त्रास दिल्यानं, मानसिक त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या 19 वर्षीय सानिका रेणुसे हीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सानिकाने राहत्या घराच्या पाठीमागच्या बाजूला असणाऱ्या पडवीच्या छताच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही घटना 15 मेला घडली आहे. 23 मेला तरुणीचे वडील संतोष रेणुसे यांनी फिर्याद दिल्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखलं करण्यात आला होता. त्यानंतर आता न्यायालयाने 19 वर्षीय आरोपी अविनाश रेणुसे याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
15 मेला सानिका स्वयंपाक करत असताना, तीला अविनाशचा फोन आला. फोनवरून अविनाशने सानिकाला शिवीगाळ करून दमदाटी केली. यापूर्वी देखील सानिकाची त्याने छेडछाड केली होती. त्यावेळी अविनाशला सानिकाच्या नातेवाईकांनी समज दिली होती. तरीदेखील तो सानिकाची छेडछाड करून मानसिक त्रास देत होता. 15 मेला आलेल्या फोन वर अविनाश याने सानिकाशी अपशब्दात वाद घातला आणि फोनवर तू मला त्रास देऊ नकोस असं म्हणतं घराच्या मागच्या बाजूला ती निघून गेली.
त्यातून नैराश्य आल्यानं सानिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने घरच्यांनी सानिकाशी शोधाशोध केल्यानंतर ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात नागरिकांकडून संताप व्यक्त होतं आहे.