एकमेकांच्या संमतीने संबंध ठेवले तर पार्टनरवर बलात्काराचा आरोप करता येणार नाही- सुप्रीम कोर्ट
Supreme Court : 2013 साली ही महिला पुरुषाच्या संपर्कात आली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या संमतीने संबंध घेऊ लागले. जून 2014 मध्ये महिलेने दुसऱ्या एका पुरुषासोबत लग्न केलं.
मुंबई : सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) एका खटल्याप्रकरणी महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलताना एका व्यक्तीवर करण्यात आलेले बलात्काराचे आरोप रद्द केले आहेत. एकमेकांच्या संमतीने जर संभोग (Physical Relations) केला किंवा संबंध ठेवले असतील, तर अशा प्रकरणात पार्टनरवर बलात्काराचा (Rape Allegations) आरोप करता येऊ शकत नाही, असं महत्त्वपूर्ण मत कोर्टाने यावेळी नोंदवलंय. एका महिलेचे लग्नाआधी दुसऱ्या एका पुरुषासोबत संबंध होते. विशेष म्हणजे या कारणास्तव या महिलेने घटस्फोटही घेतला. घटस्फोट घेतल्यानंनतरही ही महिला त्याच पुरुषासोबत बराच काळ संबंधात होती. एकमेकांच्या संमतीने दोघांनी संबंध ठेवले होते. पण नंतर या प्रकरणातील पुरुषाने दुसऱ्याच एका महिलेशी लग्न केलं आणि वारंवार दबाव टाकूनही घटस्फोट घेतला नाही. त्यामुळे महिलेनं पुरुषावर बलात्काराचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली असता, आरोपीला दिलासा देत कोर्टाने तक्रारदार महिलेला फटकारलंय.
काय आहे नेमकं प्रकरण?
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बलिया येथील महिलेने एका पुरुषाविरोधात तक्रार नोंदवली होती. 2013 साली ही महिला पुरुषाच्या संपर्कात आली होती. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या संमतीने संबंध घेऊ लागले. जून 2014 मध्ये महिलेने दुसऱ्या एका पुरुषासोबत लग्न केलं. पण तरिही या महिलेचे दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवणं सुरुच होतं. लग्नानंतर आपल्या पतीला घटस्फोट देताना आपले या पुरुषासोबत संबंध असल्याचंही कारणही या महिलेनं दिलं होतं. पण आरोप करण्यात आलेल्या पुरुषानं आपल्या पत्नीला घटस्फोट न देता आपल्याला धोका दिला, म्हणून या महिलेने बलात्काराचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखळ केली होती. पोलिसांनी याप्रकरणी 376 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल घेत चार्जशीट फाईल केली होती.
..मग सुप्रीम कोर्टात धाव
दरम्यान, सत्र न्यायालय आणि इलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणी महिलेची तक्रार रद्द करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या महिलेने अखेर सुप्रीम कोर्टात दाद मागितली. न्यामूर्ती डीवाई चंद्रचूड आणि एएस बोपन्ना यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणाची सुनावणी झाली. सकृतदर्शनी पुराव्यांच्या आधारे कोर्टाने निरीक्षण नोंदवताना म्हटलंय की, दोघांनीही एकमेकांच्या संमतीने संभोग केला आणि एकमेकांशी संबंध ठेवले. लग्न झालेलं असतानाही संबंध ठेवण्याचा निर्णय त्यांनी एकमेकांच्या सहमतीने घेतला होता. संशयित आरोपी पुरुष आणि तक्रारदार महिला दोघेही प्रौढ असून त्यांनी स्वतः हे पाऊल उचललंय. त्यांच्यावर कुणीही जबरदस्ती केली नसल्याचंही कोर्टाच्या निदर्शनास आलंय. लग्नानंतर आणि घटस्फोटानंतरही एकमेकांचे संबंध सुरु होते, असंही कोर्टाच्या निदर्शनास आलंय.
कोर्ट काय म्हणालं?
दरम्यान, चार्जशीटमध्ये दाखल करण्यात आलेल्या आरोपांनुसार आणि सकृतदर्शनी पुरवांच्या आधार घेत, संशयित आरोपींवर कलम 376 अन्वये गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. आरोपीनं खोटं बोलून महिलेला संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं होतं का, या हा प्रकरणातील प्रमुख मुद्दा आहे. लग्नाचं सुरुवातील दिलेलं वचनही खोटं होतं का, याचाही तपास करणं गरजेचं असल्याचं कोर्टानं म्हटलंय. दरम्यान, दोघांमधील संबंधांना दोघांनीही अनुमती दिली होती, त्यामुळे या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय.