Thane Child Death : ठाणे महापालिका शाळेत धक्कादायक प्रकार, दहा वर्षाच्या मुलगा अचानक शाळेत कोसळला अन्…
मानपाडा परिसरातील ठाणे महापालिका अंतर्गत शाळा क्रमांक 64 येथे एक दहा वर्षीय मुलगा मधल्या सुट्टीत अचानक खाली कोसळला. खाली कोसळल्यानंतर त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.
ठाणे / निखिल चव्हाण (प्रतिनिधी) : ठाणे महापालिका शाळेत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मानपाडा परिसरातील महाापालिका शाळा क्र 64 मध्ये एका 10 वर्षाच्या मुलाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आधीच महापालिका शाळांवर अनेक वेळा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असताना आज घडलेल्या या घटनेमुळे सर्वच हैराण झाले आहेत. मुलाला सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदनानंतर मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे उघड होईल. या प्रकारामुळे महापालिका शाळांवर पुन्हा एकदा ताशेरे ओढले जात आहेत.
मधल्या सुट्टीत अचानक मुलगा खाली कोसळला
मानपाडा परिसरातील ठाणे महापालिका अंतर्गत शाळा क्रमांक 64 येथे एक दहा वर्षीय मुलगा मधल्या सुट्टीत अचानक खाली कोसळला. खाली कोसळल्यानंतर त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला.
घटनेवेळी शिक्षक जेवायला बाहेर गेले होते
घटना घडली तेव्हा शाळेतील शिक्षक जेवणासाठी बाहेर गेले होते. यावेळी ही घटना अचानक घडली. मात्र शाळेत कुणी नसल्याने मुलावर उपचार करायला वेळ लागला. मुलाला उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
शाळा आणि शिक्षक मुलाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा पालकांचा आरोप
मुलाच्या मृत्यूला शाळा आणि शिक्षकच सर्वस्वी जबाबदार असल्याचा आरोपी त्याच्या पालकांनी केला आहे. मुलाच्या मृत्यूचे कारण कळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. मुलाचे सिव्हिल रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येत आहे. शवविच्छेदनानंतरच मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते कळेल.
या प्रकरणानंतर ठाणे महानगरपालिकेतील शाळेच्या भोंगळ कारभाराला धारेवर धरत प्रशासनाला जाब विचारला आहे. मुलाच्या मृत्यूबाबच पोलीस तपास करत आहेत.