बंगळुरु : कर्नाटकातील बंगळुरूमध्ये एका शाळेतील शिक्षकाने प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना उभे राहण्याची शिक्षा दिली होती. शिक्षेदरम्यान एका मुलीला चक्कर आली आणि ती खाली कोसळली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. बंगळुरुतील गंगामागुडी परिसरात एका खाजगी शाळेत शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
शिक्षकाने शुक्रवारी काही कारणामुळे वर्गातील सर्व मुलांना शिक्षा केली. मुलांना वर्गात बसून नाही तर उभे राहून अभ्यास करण्याची शिक्षा दिली होती. यादरम्यान निशिता या मुलीला चक्कर आल्याने ती जमिनीवर कोसळली.
शाळेतील शिक्षकांनी निशिताला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल नेले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. निशिताच्या पालकांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला.
अहवालात मुलीच्या शरीरावर मारहाणीच्या कोणत्याही खुणा किंवा कोणत्याही जखमा आढळल्या नाहीत. याप्रकरणी सध्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
पोलीस पथक शाळेत दाखल होत शिक्षकांची चौकशी सुरु आहे. यासोबतच शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासण्यात येत आहे. निशिताचे वडील नागेंद्र भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये काम करत असून दोड्डनचेनप्पा येथे तेथे ते राहतात.
याआधी शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याची किडना सुजल्याची घटना काही दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये घडली. गीर सोमनाथ जिल्ह्यातील सरकारी शाळेत हा गंभीर घटना घडली. दहावीत शिकणारा विद्यार्थी शाळेत उशिरा आला म्हणून रागाच्या भरात शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केली. मारहाणीनंतर मुलाची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.