एकाच कुटुंबातील सहा जणांचा संशयास्पद मृत्यू, हत्या की आत्महत्या?
कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत अद्याप कोणताही खुलासा होऊ शकला नाही. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत.
उदयपूर : एकाच कुटुंबातील सहा लोकांचे संशयास्पदरित्या घरात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये आई-वडिल आणि चार मुलांचा समावेश आहे. राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सर्व मृतदेह ताब्यात घेत पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवले.
हत्या की आत्महत्या याबाबत खुलासा नाही
कुटुंबाने सामूहिक आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याबाबत अद्याप कोणताही खुलासा होऊ शकला नाही. पोलीस याप्रकरणी सखोल तपास करत आहेत. प्रकाश गमेती आणि दुर्गा गमेती अशी मयत जोडप्याची नावे असून, त्यांच्या चार मुलांचाही मृत्यू झाला आहे.
डॉग स्कॉड घटनास्थळी दाखल
घटनास्थळी डॉग स्कॉड पण दाखल झाले असून, घरातील प्रत्येक वस्तू तपासण्यात येत आहे. प्रथमदर्शनी आर्थिक विवंचनेतून कुटुंबाने आत्महत्या केल्याचे दिसत आहे. दुर्गाचा मृतदेह जमिनीवर पडला होता.
मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेले आढळले
प्रकाशने आधी सर्वांची गळा दाबून हत्या केली आणि मग मृतदेह दुपट्टा आणि साडीच्या सहाय्याने लटकवले, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. प्रकाश गुजरातमध्ये नोकरी करत होता.
मयताच्या भावाने दिली घटनेची माहिती
शेताजवळ प्रकाश आणि त्याचे दोन भाऊ राहत होते. प्रकाशच्या दोन्ही भावांची स्वतंत्र घरे आहेत. प्रकाशच्या भावानेच घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस सर्व बाजूने घटनेचा तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच हत्येचे नेमके कारण स्पष्ट होईल.