तलाठी कार्यालयात रक्तपात, खुर्चीवर बसलेला तलाठी रक्ताच्या थारोळ्यात, राज्यभरात खळबळ
हिंगोलीत एका तलाठीचा निर्घृण खून करण्यात आला आहे. संतोष पवार असं मृत तलाठीचं नाव आहे. त्यांच्या हत्येनंतर राज्यभरात पडसाद उमटताना दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. संतोष पवार तलाठी सज्जात कामकाज सुरू असताना आरोपीने त्यांच्यावर हल्ला केला. आरोपीने आधी संतोष पवार यांच्या तोंडवर मिरची पूड फेकली. त्यानंतर आरोपीने संतोष पवार यांच्यावर चाकूने हल्ला केला. संबंधित घटना ही बुधवारी (28 ऑगस्ट) घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तलाठी पदावर कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याची अशाप्रकारे निर्घृण हत्या कशी होऊ शकते? आरोपीला पोलिसांचं भय नव्हतं का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. या प्रकरणी विविध कलम अंतर्गत आरोपी विरोधात हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.
या खुनाचे पडसाद आज राज्यभर पाहायला मिळत आहेत. तलाठी महासंघाच्या वतीने आज राज्यभर काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. या आंदोलनात महसूल विभागातील विविध संघटना सहभागी झाल्या आहेत. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोरही महसूल विभागातील वेगवेगळ्या संघटनांच्या वतीने संतोष पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून काम बंद आंदोलन सुरू करण्यात आहे.
आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी
कार्यालयासमोर महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत. या प्रकरणातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्या, अशी मागणी यावेळी आंदोलक कर्मचाऱ्यांनी केली आहे.
आरोपीने तलाठीची हत्या का केली?
“संतोष पवार यांच्यावर झालेला भ्याड हल्ला अत्यंत निंदनीय आहे. मानसिक विकृतीने केलेला हा हल्ला आहे. अनेक माध्यमांनी फेरफार न केल्याने तलाठ्याचा खून झाला, अशा बातम्या आलेल्या आहेत. पण ही वास्तविकता नाही. आमच्याकडे आलेली माहिती अशी आहे की संतोष पवार या तलाठ्याकडे कोणतेही कामकाज पेंडिंग नव्हतं. भावकीतला वाद आणि आपली जमीन हा तलाठी कोणाच्या नावावर करेल का? अशा मानसिक विकृतीमधून हा खून झाला”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी सांगितले.