ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची अटक टळली; पुणे कोर्टा कडून दिलासा
भास्कर जाधव यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता
पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे नेते भास्कर जाधव यांची अटक टळली आहे. पुणे कोर्टा कडून भास्कर जाधव यांना दिलासा मिळाला आहे. भाषणात वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणी भास्कर जाधव यांच्या विरोधात पुण्यातील डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पुणे कोर्टाने भास्कर जाधव यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
कुडाळ येथे आमदार वैभव नाईक यांचे विरुद्ध चाललेल्या कारवाई विरुद्ध भास्कर जाधव यांनी निषेध मोर्चा काढला होता. यावेळी भाषण करताना भास्कर जाधव यांनी नारायण राणे व त्यांच्या पुत्रांवर घणाघाती टीका केली होती.
वादग्रस्त भाषणा प्रकरणी पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी सामाजिक भावना भडकावल्या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
भास्कर जाधव यांच्या वतीने वकिल विजयसिंह ठोंबरे यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज दाखल केला होता.
सुनावणी वेळी वकिल ठोंबरे यांनी भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबिया विरुद्ध वैयक्तीक टीका केली असून कोणत्या समाज, जात, धर्मा विरुद्ध टीका केली नसल्याचा दावा केला.
भास्कर जाधव यांचा आवाज दाबण्या साठी त्यांच्या वर खोटी कलमे लावत राजकिय दबावातून खोटा गुन्हा दाखल केला असल्याचा युक्तीवाद केला.
युक्तीवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश जी ए रामटेके यांनी अटी व शर्ती वर आमदार भास्कर जाधव यांना हंगामी अटकपूर्व अर्ज मंजूर केला आहे.