ठाकरे गटाच्या कथित बोगस प्रतिज्ञापत्र घोटाळ्यात मोठी अपडे; शिवसैनिकांची मुंबई क्राईम ब्रांचकडून…..
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे खोटी असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबईत खोट्या प्रतिज्ञापत्रांचा घोटाळा उघड झाला. यानंतर मुंबई क्राईम ब्रांचने तपासाचा वेग वाढवला आहे. राज्यभरातील शिवसैनिकांची मुंबई क्राईम ब्रांचकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक चौकशीसाठी थेट कोल्हापूर, पालघर, अहमदनगर आणि नाशिकमध्ये धडकले आहे. अनेक शिवसैनिकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना खरी आहे, हे दर्शविण्यासाठी शिवसैनिकांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे खोटी असल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. यानंतर ठाकरे गटाचा हा कथित बोगस प्रतिज्ञापत्र घोटाळा उघडकीस आला.
ठाकरे यांना पाठिंबा देत असल्याची अनेक शपथपत्र मुंबईत एकाच ठिकाणी आढळून आली होती. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहिम, वांद्रे परिसरात क्राईम ब्रांचने धाडी टाकल्या. या कारवाई दरम्यान पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट कागदपत्र हस्तगत केली होती.
मुंबई क्राईम ब्रँचचे पथक कोल्हापुरात दाखल
मुंबई क्राईम ब्रँचचे एक पथक आता कोल्हापुरात दाखल झाले. प्रतिज्ञापत्राची खातरजमा करण्यासाठी दोन अधिकारी, दोन कर्मचारी असे चौघांचे पथक कोल्हापुरात पोहचले आहे.
बनावट प्रतिज्ञापत्र चौकशीसाठी मुंबई क्राईम ब्रँचची टीम हातकणंगले पोलिस ठाण्यात दाखल झाली. कागदपत्रांचे गठ्ठे घेऊन क्राइम ब्रांच पोलीस ठाण्यात पोहचली आहे.
पाच ते सहा शिवसैनिकांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव,विजय देवणे देखील हातकणंगले पोलिस ठाण्यात आले आहेत. 4 हजार 682 खोटी प्रतिज्ञापत्र बनवली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.