Dombivli Crime : नातेवाईकांना भेटून परत निघाली, पण लोकलमध्ये आला ‘नकोसा’ अनुभव… त्या आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक

| Updated on: Oct 26, 2023 | 10:26 AM

पीडित महिला डोंबिवलीहून घाटकोपरला जाणाऱ्या फास्ट लोकलच्या जनरल डब्यात पती आणि मुलांसह प्रवास करत होती. मात्र त्याचवेळी तिच्यासोबत असं काही घडलं, ज्याने ती हादरली.

Dombivli Crime : नातेवाईकांना भेटून परत निघाली, पण लोकलमध्ये आला नकोसा अनुभव... त्या आरोपीला रेल्वे पोलिसांकडून अटक
Follow us on

डोंबिवली | 26 ऑक्टोबर 2023 : मुंबईतील महिलाविरोधातील (crime case) गुन्ह्यांमध्ये वाढताना दिसत आहे. मुंबईकरांची लाइफलाइन असलेली लोकलही महिलांसाठी सुरक्षित नाही, कारण तिथेही त्यांना बराच त्रास सहन करावा लागतो. गर्दीचा फायदा घेऊन स्टेशनवर किंवा लोकलमध्ये नको तो, नको तिथे स्पर्श करणाऱ्यांमुळे महिला हादरतात, पण फारच कमी जणी या अन्यायाविरोधात आवाज उठवतात.

अशीच एक घटना उघडकीस आली असून लोकलप्रवासादरम्यान महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला डोंबिवली रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डोंबिवली आणि घाटकोपदरम्यान धावत्या लोकलमध्ये आरोपीने महिलेला अनेकवेळा स्पर्स केला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या १२ तासांच्या आत आरोपीला अटक केली. हरीशकुमार सुदुला ( वय २७) असे आरोपीचे नाव आहे.

नातेवाईकांकडून परत येताना घडला तो प्रकार

जीआरपी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिचा पती आणि मुलांसोबत घाटकोपर भागात राहते तर आरोपी हरीशकुमार हा विक्रोळीतील टागोर नगर येथे राहतो. पीडित विवाहित महिला तिच्या पतीसह आणि मुलांसोबत घाटकोपरहून डोंबिवलीत एका नातेवाईकाला भेटण्यासाठी आली होती. तर आरोपी हरीशकुमार हाही कामानिमित्त डोंबिवलीत आला होता.

23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास पीडित महिला ही घरी जाण्यास परत निघाली. डोंबिवलीहून घाटकोपरला जाणाऱ्या फास्ट लोकलच्या जनरल डब्यातून ती पती आणि मुलांसह प्रवास करत होती. त्याचवेळी आरोपी हरीशकुमार हादेखील त्याच जनरल डब्यातून प्रवास करत होता. डोंबिवली स्थानकावर डब्यात चढत असताना आरोपीने पीडितेचा विनयभंग केला. त्यानंतर डोंबिवली ते घाटकोपर दरम्यान लोकलच्या गर्दीचा फायदा घेत हरीशकुमारने पुन्हा पीडितेजवळ जाऊन तिचा विनयभंग केला.

ट्रेन घाटकोपरला पोहोचल्यानंतर खाली उतरताना हरीशकुमारने पुन्हा तिला चुकीचा स्पर्श केला आणि तो तिथून पळाला. मात्र या सर्व घटनेमुळे पीडित महिला अतिशय घाबरली आणि तिने घडलेला सर्व प्रकार तिच्या पतीला सांगितला. त्यानंतर 24 ऑक्टोबर रोजी दुपारी पीडित महिलेने डोंबिवली जीआरपी पोलिस स्टेशन गाठून घडलेला तेथील अधिकाऱ्यांना सर्व प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम 354, 354 (ए) अन्वये गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर डोंबिवली जीआरपी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेऊन ओळख पटवली आणि त्याला विक्रोळी येथून ताब्यात घेत अटक केली.