Thane Crime : प्रेमात कर्जबाजारी झाला आणि अट्टल बाईकचोर बनला, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
प्रेमात पडल्यानंतर माणसं काय करतील याचा नेम नाही. याच प्रेमापायी कधी तुरुंगातही जाण्याची वेळ येऊ शकते, हे एका घटनेवरुन सिद्ध झाले आहे.
ठाणे / 19 ऑगस्ट 2023 : प्रेमात पडणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. प्रेम आंधळं असतं असं म्हटलं जातं. पण याच आंधळ्या प्रेमापायी कधी कधी नको ते घडतं. अशीच एक धक्कादायक घटना ठाण्यात उघडकीस आली आहे. ठाणे जिल्ह्यात ऊच्छाद मांडणाऱ्या 15 बाईक चोराचा सीसीटीव्हीचा आधार घेत ठाणे पोलिसांनी छडा लावला. आरोपीच्या चौकशीत जे समोर आलं ते ऐकून पोलीसही चक्रावले. प्रेयसीचे हटट्ट पुरवण्याच्या नादात तो कर्जबाजारी झाल्याने कर्ज फेडण्यासाठी तो चोर बनला. गणेश म्हाडसे असे अटक आरोपीचे नाव आहे. आरोपीला ठाणे न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रेयसीवर पैसे खर्च करुन कर्जबाजारी झाला
मुरबाड तालुक्यातील टोकावडे येथील रहिवासी असलेल्या गणेश म्हाडसे याचे एका तरुणीवर प्रेम होते. गणेश प्रेमात इतका आकंठ बुडाला होता की, प्रेमासाठी वाट्टेल ते म्हणत प्रेयसीवर पैसे खर्च करत गेला. मात्र या प्रेमापायी तो कर्जबाजारी झाला. यामुळे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत तो होता. यातून त्याने बाईक चोरीचा धंदा सुरु केला. ठाणे शहर आणि आसपासच्या बाईक चोरायचा आणि मुरबाडच्या ग्रामीण भागात नंबर प्लेट बदलून विकायचा.
सीसीटीव्हीमुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात
बाईक चोरी आणि विक्रीतून गणेशचे कर्ज लगेच फिटले. मात्र त्यांनंतर त्याला झटपट पैसे कमावण्याचा मोह त्याला झाला. त्यामुळे त्याने चोरीचा धंदा सुरुच केला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, बदलापूर आदि ठिकाणाहून त्याने बाईक चोरी केल्या. कळवा रुग्णालयातील एका बाईक चोरीचा तपास करताना पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये हा तरुण दिसून आला. त्याचा शोध घेत पोलिसांनी थेट टोकावडे गाठलं आणि या अट्टल बाईक चोराला बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 15 चोरी केलेल्या बाईक्स जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी त्याच्या साथीदाराला सुद्धा अटक केली आहे.