Thane Crime : घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली महिलेची फसवणूक, औषध विक्रेत्या महिलेला लाखोचा गंडा
कल्याणमध्ये पुन्हा फसवणुकीची घटना उघडकीस आली आहे. एका महिलेला घरपोच सेवेच्या नावाखााली गंडवल्याची घटना घडली आहे.
कल्याण : वस्तू घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली ऑनलाईन माध्यमातून कल्याण पूर्वेत एका औषध विक्रेता महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. भामट्यांनी 2 लाख 75 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे आरोपीने आधी दुकानात ओळख करत नंतर व्हॉट्स ॲपवर संपर्क केला. मग खासगी कंपनीकडून पार्सल आल्याचे सांगत त्या वस्तूवर तुम्हाला सीमा शुल्क भरायचे असल्याने तुम्हाला पहिले 25 हजार रुपये भरण्यास सांगितले. सीमा शुल्क भरले नाही तर फौजदारी गुन्हा दाखल होईल अशी भीती दाखवत भामट्यांनी ऑनलाईन 2 लाख 75 हजार रुपये लाटले. या प्रकरणी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्यात महिलेने गुन्हा दाखल केला असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
महिला औषधांचे दुकान चालवते
पूजा उमेश सिंग असे फसवणूक झालेल्या औषध विक्रेता महिलेचे नाव आहे. कल्याणच्या पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात ही महिला राहते. महिलेने तिसगाव जरीमरी नगर भागात एक औषध दुकान भाड्याने चालविण्यास घेतले आहे. पूजा या औषध विक्रेता पदविकाधारक आहेत. मे मध्ये संध्याकाळच्या वेळेत पूजा दुकानात बसल्या होत्या. यावेळी डॅनियल जॅक नावाचा एक इसम औषधांची माहिती घेण्यासाठी दुकानात आला. त्याने जाताना पूजा यांचे व्हिजिटिंग कार्ड आणि दुकानाचा फोटो काढून नेला.
‘अशी’ झाली फसवणूक
भेटीच्या दोन दिवसानंतर डॅनियल याने पूजा यांना व्हॉट्स ॲपवर संपर्क केला. तुम्हाला एक वस्तू खासगी वाहन कंपनीकडून पाठवली आहे, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर राम चाली नावाच्या इसमाने पूजा यांना मोबाईलवर संदेश पाठवला. ब्रॉडवे शिपिंग डिलिव्हरी कंपनीकडून एक वस्तू आली आहे. ती वस्तू आमच्या ताब्यात आहे. त्या वस्तूवर तुम्हाला सीमा शुल्क भरायचे असल्याने तुम्हाला पहिले 25 हजार रुपये भरावे लागतील. सीमा शुल्क भरले नाही तर फौजदारी गुन्हा दाखल होईल अशी भीती पूजा यांना भामट्यांनी घातली.
वस्तू नाकारली तर गुन्हा दाखल होईल या भीतीने भामट्यांनी दिलेल्या बँक खात्यावर पूजा यांनी ऑनलाईन माध्यमातून सीमा शुल्क मुक्त दर, डॉलर विनिमय दर, प्राप्तिकर, वाहतूक खर्च, इतर दंडात्मक रक्कम अशी एकूण 2 लाख 75 हजार रुपये भरणा केले. प्रत्यक्षात पूजा यांना वस्तू मिळाली नाही. त्यांनी डॅनियल याला संपर्क करुन भरणा केलेले पैसे परत करण्याची मागणी सुरू केली. मात्र तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पैसे परत मिळण्याची खात्री नसल्याने पूजा सिंग यांनी कोळसेवाडी पोलिसांच्या ठाण्यात दोन भामट्यांच्या विरुध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.