कल्याण / 10 ऑगस्ट 2023 : कल्याण स्थानकात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. प्रवाशांना लुटण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत. कधी गर्दीचा फायदा घेत, तर कधी झोपेत असलेल्या प्रवाशांना लुटण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. प्रवाशांना लुटल्याच्या तक्रारी वाढत चालल्याने कल्याण लोहमार्ग पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले. स्टेशनवर झोपलेल्या प्रवाशांच्या खिशातून मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या तिघांच्या कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. गुलाम अजगर शेख, जुनेद हुसेन खान उर्फ शाहरुख अब्रार खान, करण आण्णासाहेब गायकवाड अशी तीन अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींनी आतापर्यंत किती प्रवाशांची लूट केली आहे, किती मुद्देमाल चोरला आहे, याबाबत पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.
कल्याण स्थानकातून मध्य रेल्वेवरुन सुटणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या थांबतात. यामुळे मुंबईबाहेर जाणाऱ्या प्रवाशांची इथे कायम गर्दी असते. मध्यरात्रीच्या सुमारास येणाऱ्या गाड्या किंवा पहाटे येणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी प्रवाशी स्थानकातच झोपतात. या झोपलेल्या प्रवाशांच्या शेजारी प्रवासी म्हणून झोपायचे आणि त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू हातचलाखीने घेऊन पसार व्हायचे.
कल्याण स्थानकात झोपलेल्या प्रवाशांच्या खिशातून मोबाईल, पैसे चोरीला जात असल्याच्या अनेक तक्रारी कल्याण लोहमार्ग पोलिसात दाखल झाल्या होत्या. यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर आले. पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरु केला. यानंतर तांत्रिक तपास, सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांनी चोरट्यांची ओळख पटवली. मग सापळा रचून चोरट्यांनी अटक केली आहे. लोहमार्ग पोलीस आरोपींची कसून चौकशी करत आहेत.