Thane Crime : जिना चढताना झालेल्या स्पर्शाकडे दुर्लक्ष केलं, त्याने पुन्हा हात लावताच झपकन मागे वळून तिने..
गर्दीचा फायदा घेऊन महिलाना नको तिथे स्पर्श करणारे, हात लावणारे अनेक जण फिरत असतात. रेल्वे प्रवासाताही हा अनुभव अनेकांना येतो. मात्र काही जणी त्याकडे दुर्लक्ष करतात, तर काही जणी न घाबरता परिस्थितीचा सामना करून गुन्हेगारांना शिक्षा देतात.
ठाणे| 22 सप्टेंबर 2023 : मुंबई म्हटलं की लोकल प्रवास आला आणि हा प्रवास म्हणजे नुसता गर्दीचा. कामावर जाण्यासाठी लाखो लोक याच गर्दीचा एक भाग बनून दररोज प्रवास करत असतात. पण याच गर्दीचा कधीकधी नकोसा अनुभव येऊ शकतो. विशेषत: महिलांना. गर्दी पाहून, कोणी बघत नाहीये यावर लक्ष ठेऊन इकडे-तिकडे स्पर्श करणारे असंख्य हात या गर्दीत असतात. बहुतांश महिलांना हा अनुभव कधी ना कधी येतोच. पण लाजेखातर, किंवा कामाला जायचंय, उशीर होईल अशी सबब देऊन महिला याबद्दल आवाज उठवत नाहीत आणि अशा लोकांचं अजूनचं फावतं. पण काही महिला अशाही असतात, ज्या त्यांच्याविरोधात आवाज उठवतात आणि अशा नीच प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच धडा शिकवतात. शिक्षेमुळे त्यांना वेळीच आळा बसतो.
असाच एक किस्सा नुकताच ठाणे स्थानकात (thane station) घडला. तेथे एका महिलेने अशा विकृत मनोवृत्तीच्या माणसाविरोधात वेळीच आवाज उठवत पोलिसांत धाव घेतली. पीडित महिलेने ठाणे रेल्वे पोलिसात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली असून त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यातत आला आहे. मोहम्मद राराणी (वय ४५) असे आरोपीचे नाव असून मुंब्रा येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (वय ३४) कल्याणची रहिवासी असून ती ठाण्यातील एका विमा कंपनीत कर्मचारी म्हणून कार्यरत आहे.
काय घडलं त्या दिवशी ?
21 सप्टेंबर रोजी सकाळी 8.30 च्या सुमारास ही महिला कल्याण येथून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढली. ठाणे स्थानकात उतरल्यावर फलाट क्र. 4 येथील पुलाचा जिना चढत असताना आरोपीने तिला मागून अयोग्यरित्या स्पर्श केला. सुरुवातीला तिने या घटनेकडे दुर्लक्ष केले, मात्र ती पायऱ्या चढत असताना त्याने पुन्हा तिला तसाच स्पर्श केला. हे पाहून ती संतापली आणि गर्रकन मागे वळली. आवाज चढवत तिने आरोपीला जाब विचारला आणि प्लॅटफॉर्मवर गस्त घालणाऱ्या पोलिस हवालदाराची मदत घेतली. पोलीसांने तिने आरोपीला ठाणे रेल्वे पोलीस ठाण्यात आणले आणि त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.
आरोपी मोहम्मद हा वाशी येथील एका कांदे-बटाट्यांच्या दुकानात काम करतो. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली.
विद्याविहार स्टेशनवर देखील घडला असाच प्रकार
काही दिवसांपूर्वी मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्थानकावर देखील अशीच घटना घडली होती. 4 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 च्या सुमारास एक महिला वकील घाटकोपर येथून ट्रेनने विद्याविहार येथे आली. ती ब्रीजचा जिना चढत असताना, आरोपी जिना उतरून खाली येत होता. तो अचानक पीडित महिलेच्या समोर येऊन उभा राहिला आणि तिच्याकडे अश्लील नजरेने पाहत त्याने तिचा थेट हातच धरला. ती महिला एक क्षण भांबावली पण दुसऱ्याच क्षणी तिने आरडाओरडा सुरू केला आणि स्टेशनवर गस्त घालणाऱ्या पोलिसांना मदतीसाठी हाक मारली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला पकडले. त्यानंतर पीडित महिलेने कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला.