लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेच्या मुलीवर बळजबरी, हत्या करून आरोपी फरार
आरोपीकडून तामिळनाडू पोलिसांनी 3 अंगठ्या आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत.
पालघर – तामिळनाडू येथे एका १८ वर्षीय मुलीची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीनं तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचंही समोर आलं. शिवाय त्याने तिच्या अंगावरील दागिने चोरले होते. अशा या नराधम आरोपीचा शोध घेण्यात आला. तामिळनाडूतील आरोपी हा विरार पोलीस हद्दीत सापडला. आरोपीला वसई न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर ट्रान्झिट रिमांडद्वारे त्याला तामिळनाडू येथे नेण्यात आले.
राजू मणी नायर असं आरोपीचं नाव आहे. राजू हा एका महिलेच्या लिव्ह इनमध्ये होता. ही घटना आवडी पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणा-या पोणामल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. 13 जुलै 2022 रोजी राजूनं लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणा-या एका महिलेच्या 18 वर्षाच्या मुलीशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिकार केल्यानंतर या नराधमाने तिची गळा आवळून हत्या केली.
त्यानंतर या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. शिवाय तिच्या अंगावरील दागिने घेवून फसार झाला होता. हा आरोपी विरार येथील मनवेल पाडा येथे राहत असल्याचं तामिळनाडू पोलिसांना कळले. तामिळनाडू पोलिसांनी विरार पोलिसांच्या मदतीने शुक्रवारी त्याला अटक केली.
आरोपीकडून तामिळनाडू पोलिसांनी 3 अंगठ्या आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. आरोपीला वसई कोर्टातून ट्रान्झिट रिमांड मिळाला. त्यानंतर तामिळनाडूतील पोलीत त्याला घेवून गेले आहेत. अशी माहिती सरकारी वकील प्राची शाह यांनी दिली.