पोलिसांच्या डोळ्यात धुळफेक करत फरार झाला होता आरोपी, अखेर दोन वर्षांनी पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच !
कल्याण मानपाडा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला कुख्यात सराईत इराणी चोरटा दोन वर्षापूर्वी भिवंडी येथील क्वारंटाईन सेंटरमधून 32 व्या माळ्यावरून मागच्या बाजूला असलेल्या पाईपवरून उतरून गाझी पसार झाला होता.
कल्याण : दोन वर्षांपूर्वी क्वारन्टाईन सेंटरमधून पलायन केलेल्या मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या कुख्यात इराणी आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गाझी दारा इराणी जाफरी असे या आरोपीचे नाव आहे. या आरोपीवर मोक्का अंतर्गत चार गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी क्वारन्टाईन सेंटर इमारतीच्या 32व्या मजल्यावरून पाईपच्या सहाय्याने उतरून पसार झाला होता. कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारुन आरोपीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही पोलिसांनी त्याच्यावर झडप घालत त्याच्या मुसक्या आवळल्या.
दोन वर्षांपूर्वी क्वारन्टाईन सेंटरमधून केले होते पलायन
कल्याण मानपाडा पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला कुख्यात सराईत इराणी चोरटा दोन वर्षापूर्वी भिवंडी येथील क्वारंटाईन सेंटरमधून 32 व्या माळ्यावरून मागच्या बाजूला असलेल्या पाईपवरून उतरून गाझी पसार झाला होता. या चोरट्याला अखेर खडकपाडा पोलिसांनी सापळा रचत बेड्या ठोकल्या.
कारवाईसाठी केलेल्या पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न
गाझी कल्याणजवळील लहुजी नगर परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांचे पथक त्याला अटक करण्यात गेले असता गाझीने पोलिसांच्या डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या.
आरोपीकडून तीन मोटारसायकही हस्तगत
गाझीकडून आतापर्यंत तीन मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच त्याच्याकडून मिरचीचा स्प्रे, दोन चाकू आणि एक एअरगन देखील जप्त करण्यात आली आहे.
गाझी विरोधात खडकपाडा, कोनगाव, महात्मा फुले, मानपाडा, बदलापूर, भिवंडीमधील निजामपूर पोलीस ठाण्यात एकूण 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.