पैशासाठी महिलेची हत्या करुन लुटल्याची घटना, अखेर 12 वर्षांनी आरोपीला सुनावली ‘ही’ शिक्षा
पैशाची गरज असल्याने तरुण महिलेकडे पैशांची मागणी करत होता. मात्र महिलेने पैसे देण्यास नकार दर्शवला. यामुळे तरुण संतप्त झाला अन् भलतंच करुन बसला. अखेर न्यायालयाने आज या प्रकरणावर निकाल सुनावला.
डोंबिवली / सुनील जाधव : वारंवार पैसे मागून महिला पैसे द्यायला तयार नसल्याने संतप्त तरुणाने महिलेची हत्या करुन तिच्या घरातील सोने लुटून पसार झाला होता. बारा वर्षांपूर्वी ही घटना घडली होती. तरुणाने एकूण एक लाख 54 हजारांचा ऐवज लुटला होता. डोंबिवली विष्णुनग पोलिसांनी तरुणाला अटक केले होते. याप्रकरणी आरोपीला न्यायालयाने अखेर शिक्षा ठोठावली आहे. संतोष श्रीधर नांबियार असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी आरोपीला 10 हजार रुपयांचा दंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
पैशाची गरज आहे सांगत महिलेकडे पैशाची मागणी केली
डोंबिवलीतील कोपर गाव हद्दीत आरोपी संतोष नांबियार हा राहत होता. याच भागात रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्समध्ये गीता वल्लभ पोकळे या राहत होत्या. आरोपी संतोष पैशाची खूप गरज आहे, असे सांगून गीता यांच्याकडे पैशाची मागणी करत होता. मात्र आपल्याजवळ पैसे नाहीत, त्यामुळे पैस देऊ शकत नसल्याचे उत्तर गीता यांनी संतोषला दिले होते.
महिलेने पैसे न दिल्याने आरोपीने केली हत्या
गीता पैसे देत नसल्याचा राग आल्याने मार्च 2011 मध्ये संतोषने गीता यांच्या घरात घुसून त्या झोपेत असताना त्यांची हत्या केली होती. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र, कपाटातील सोन्याचा ऐवज असा एकूण एक लाख 54 हजारांचा ऐवज घेऊन पलायन केले होते. या खून प्रकरणामुळे डोंबिवलीत खळबळ उडाली होती. विष्णुनगर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या होत्या.
याप्रकरणी कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी सुरू होती. याच सुनावणी दरम्यान कल्याण जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. पी. पांडे यांनी एकाच गुन्ह्यात 10 हजार रुपयांचा दंड आणि आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.