बँक व्यवस्थापकच दरोडेखोर, वर्धा बँक दरोड्याची फिल्मी कहानी
शाखा व्यवस्थापक महेश श्रीरंग याने त्याचे मित्र महेश श्रीरंग, कुशल आगासे, मनीष घोळवे, जीवन गिरडकर, कुणाल शेंद्रे यांच्या मदतीने बँकेवर दरोडा टाकला.
वर्धा : वर्ध्याच्या मुथूट फिनकॉर्न फायनान्स कंपनी कार्यालयात गुरुवारी अज्ञात आरोपीने चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत दरोडा टाकला होता. अवघ्या सहा तासांत गुन्ह्याची उकल करत चौदा तासांत आरोपींना गडाआड करण्यात पोलिसांना यश आलंय. व्यवसायात झालेल्या कर्जबाजारीपणामुळे कट रचून हा गुन्हा केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय. एवढंच नव्हे तर या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा बँकेचा व्यवस्थापकच निघाला आहे. त्याच्या आणखी चार मित्रांसह त्याने दरोड्याचा प्लॅन फत्ते केला. दरोड्यात पळविलेल्या 9 किलो 600 ग्रॅम सोन्यापैकी पोलिसांनी अडीच किलो सोनं जप्त केलंय. पोलिसांनी 2 किलो 500 ग्रॅम वजनाचं सोनं, सहा मोबाईल, पिस्टल, कार असा 4 कोटी 75 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. (The bank manager robbery On wardha muthoot finance bank help Of his pharmacist Friend)
कंपनीच्या कार्यालयात बंदूक, चाकूचा धाक दाखवत गुरुवारी दरोडा घालण्यात आला. यावेळी कुरियर बॉय असल्याचं सांगून एकाने प्रवेश करत बंदूक आणि चाकूचा धाक दाखवून सोनं आणि रोखड पळवली. या प्रकाराची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं चौकशीची चक्र फिरवली. पोलिसांनी केलेल्या तपासात पोलिसांना शाखा व्यवस्थापकावर संशय आला. संशयामुळे पोलिसांनी शाखा व्यवस्थापक महेश श्रीरंग याची चौकशी केली. याच दरम्यान व्यवस्थापकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच शाखा व्यवस्थापकाने गुन्ह्याची कबुली दिली.
शाखा व्यवस्थापक महेश श्रीरंग याने त्याचे मित्र महेश श्रीरंग, कुशल आगासे, मनीष घोळवे, जीवन गिरडकर, कुणाल शेंद्रे यांच्या मदतीने बँकेवर दरोडा टाकला. अगदी एखाद्या फिल्मी कथेलाही लाजवेल अश्या प्रकारे हा दरोडा घातला गेला. पण म्हणतात ना ‘कानून के हात बडे लंबे होते हैं…!’ पोलिसांनी अवघ्या 14 तासांत आरोपींना गजाआड केलं.
कुशल हा वर्ध्याच्या बजाज चौकातील चहा दुकानावर चहा प्यायला. तिथून तो चालत फायनान्स कंपनीच्या कार्यालयात आला. दरोडा टाकल्यावर त्याने परत याच दुकानावर येऊन चहा प्यायला. नंतर त्याने दुचाकी तिथेच सोडली. यानंतर कुशल हा स्पेशल रिक्षा करत सलोड हिरापूर येथे पोहचला. त्याचे सहकारी सालोड शिवारात त्याची वाटच बघत होते. घटनेनंतर कुशल सालोडला गेला आणि तिथून सहकाऱ्यांसह दोन कारने पसार झाला.
दरोडा टाकणारा आगाशे हा आणि इतर सर्व हे व्यवस्थापकचे लहानपणीचे मित्र होते. आगाशे याचा औषधींचा व्यवसाय असून त्याला यामध्ये नुकसान होत होतं. तो सुद्धा कर्जबाजारी झाला होता. या घटनेत व्यवस्थापक घटनेवेळी बँकेत हजर होता. जेणेकरुन दरोडा टाकताना कोणतीही अडचण येऊ नये. चोरट्याने चोरी केलेले सोने हे ऑडिट न झालेले सोने होते. त्यामुळे बँकेच्या प्रशासकीय कामकाजामध्ये अनियमितता झाल्याची दाट शक्यता आहे.
सुमारे दोन आठवड्यांपासून गुन्ह्याचा कट रचल्याचं सांगण्यात येतंय. पोलिसांनी कौशल्य पणाला लावत अवघ्या काही तासांत घटनेचा छडा लावलाय. यामध्ये आणखी कुणी सहभागी आहे काय, याचा शोध सुरु आहे. घटनेचा तपास करणाऱ्या चमूला 35 हजारांचं बक्षिस देणार असल्याचं पोलीस अधीक्षकांनी जाहीर केलंय.
व्यवसायातील अपयशानं आलेल्या कर्जबाजारीपणामुळं हा दरोडा घातल्याचं आरोपींनी पोलिसांना सांगिलं. ठेवीदारांनी घाबरून न जाता यंत्रणेवर विश्वास ठेवावा, तुमच्या ठेवी सुरक्षित आहेत, असं वर्ध्याचे पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितलं. बँक व्यवस्थापक महेश श्रीरंग हा पूर्वी यवतमाळ येथील श्रीराम फायनान्समध्ये काम करत होता. त्याच्यावर तेथेही फसवणूक केल्याचे आरोप आहेत.
(The bank manager robbery On wardha muthoot finance bank help Of his pharmacist Friend)
संबंधित बातम्या
वर्ध्यात बँकेवर दिवसाढवळ्या दरोड्याचा थरार, साडे तीन किलो सोनं लुटलं ! काय काय घडलं ?, पाहा व्हिडीओ
50 महिलांची छेड काढणारा गुन्ह्यानंतर घर का बदलत होता?
कल्याणमध्ये भाजप महिला अध्यक्षाने महिलांना लावला कोट्यवधींचा चुना; पोलिसांकडून गुन्हा दाखल