बहिणीला नांदवत का नाही विचारले; संतापलेल्या भावोजीने मेव्हण्यालाच संपवले
कराड तालुका पोलिसांनी आरोपी अवधूत मदनेचा अवघ्या अडीच तासांत शोध घेतला. त्याला मध्यरात्री करवडी येथून ताब्यात घेण्यात आले.
कराड : तालुक्यात अनंत चतुर्दशीच्या रात्री घडलेल्या हत्याकांडाने प्रचंड खळबळ उडाली आहे. बहिणीला नांदवत नसल्याच्या कारणावरून वाद (Dispute) झाला आणि भावोजीचा पारा चढला. भावोजीने मागेपुढे न पाहता मेहुण्या (Brother-in-law)ला थेट संपवून टाकला. या हत्ये (Murder)मुळे कराडसह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. कराड तालुक्यातील उंडाळे गावातील माळी वस्ती येथे काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस तातडीने घटनास्थळास्थळी दाखल झाले. त्यांनी फरार आरोपीला अवघ्या अडीच तासांत शोधून ताब्यात घेतले आहे. सचिन वसंत मंडले असे हत्या झालेल्या 35 वर्षीय मेहुण्याचे नाव आहे.
किरकोळ भांडणाचे पर्यावसन हत्येत
अनंत चतुर्दशीच्या रात्री सर्वत्र गणपती विसर्जनाचा उत्साह होता. याचदरम्यान उंडाळे गावातील माळी वस्ती येथे आरोपी भावोजी व त्याच्या मेहुण्यामध्ये बहिणीला का नांदवत नाही म्हणून भांडण झाले. त्या भांडणाचे पर्यावसन अखेर हत्येमध्ये झाले.
संतापलेल्या भावोजीने धारदार शस्त्राचा वापर करून मेहुण्याचा खून केला. रात्री 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अवधूत हणमंत मदने असे 42 वर्षीय आरोपीचे नाव आहे.
उंडाळे गावाजवळ घडली घटना
उंडाळे गावच्या पश्चिमेस कराड-रत्नागिरी रोडच्या बाजूस माळी वस्ती हे गावात ही हत्येची घटना घडली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
रेठरे खुर्द येथील मूळ रहिवाशी असलेला सचिन मंडले हा दूध व्यावसायाच्या निमित्ताने उंडाळे येथे भाड्याच्या घरात राहत होता. अवधूत मदने याने धारधार शस्त्राने सचिन मंडलेवर वार केले.
त्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कराड येथे नेण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
आरोपीला मध्यरात्री करवडी येथून घेतले ताब्यात
कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक दीपज्योती पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
कराड तालुका पोलिसांनी आरोपी अवधूत मदनेचा अवघ्या अडीच तासांत शोध घेतला. त्याला मध्यरात्री करवडी येथून ताब्यात घेण्यात आले. अधिक तपास कराड तालुका पोलीस करत आहेत.
गणपती विसर्जन सुरू असतानाच घडलेल्या या खुनामुळे उंडाळे परिसरात खळबळ उडाली आहे.