पुण्यातून कार चोरली अन् गुजरातच्या दिशेने निघाले, पण तलासरी पोलिसांनी गाठलेच
चोरट्यांनी पुण्यातून कार चोरत गुजरातच्या दिशेने पलायन केले. मात्र तांत्रिक तपासातून लोकेशन ट्रेस झाले अन् गुजरातमध्ये पोहचण्याआधीच पोलिसांनी आरोपींवर झडप घातली.
पालघर, जितेंद्र पाटील TV9 मराठी : पुण्यातून चोरलेली महिंद्रा थार घेऊन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या चाललेल्या दोन चोरट्यांना पकडण्यास पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी पाठलाग करुन मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चोरट्यांना पकडले. मिलन विजयभाई जेठवाल आणि शैलेश भिकूभाई हिंगु अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. दोघेही गुजरातमधील सूरतचे रहिवासी आहेत. कायदेशीर कारवाई करुन कार मालकाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. चोरट्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.
पुण्यातून थार कार चोरुन गुजरातकडे पळाले
पुण्यातील वैजनाथ खरमाटे यांची काळ्या रंगाची महिंद्रा थार कार जेठलाल आणि हिंगु या दोघा चोरट्यांनी चोरली. यानंतर खरमाटे यांनी पुण्यातील विमाननगर पोलिसात कार चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला. तांत्रिक तपासात ही कार मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पालघर जिल्ह्यातील तलासरी पोलिसांना याबाबत माहिती दिली.
तलासरी पोलिसांनी पाठलाग करुन पकडले
तलासरी पोलिसांनी तात्काळ गुजरातकडे जाणाऱ्या सर्व नाक्यांवर नाकाबंदी केली. यादरम्यान डहाणूतील दापचारी सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर ही कार दिसली. मात्र चोरटे भरधाव वेगात कार घेऊन गुजरातकडे गेले. पोलिसांनी गाडीचा पाठलाग करत दोन्ही चोरट्यांना कारसह ताब्यात घेतले. या प्रकरणात पुण्यातील विमाननगर पुणे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तलासरी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांनी दिली.