वडीलांची पेन्शन मुलीने त्यांची पत्नी बनून लाटली, अखेर अशी खुलली पोल
या प्रकरणात या महिलेचा पेन्शनचा अर्ज मंजूरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही भूमिकाही तपासली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
लखनऊ | 9 ऑगस्ट 2023 : उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातील अलीगंज येथील एक महिलेने दहा महिने अवैध पद्धतीने वडीलांची पेन्शन लाटल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी महिला सलग दहा वर्षे दर महिन्याला दहा हजार रुपये वडीलांची पेन्शन त्यांची पत्नी असल्याचे भासवून घेत होती. विशेष म्हणजे 36 वर्षीय मोहसीना परवेज हीच्या पतीनेच तक्रार केल्याने महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. मोहसिना हीला सोमवारी तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर अटक केली असून तिची रवानगी कोठडीत करण्यात आली असून या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे एडीएम आलोक कुमार यांनी सांगितले.
दहा वर्षांत 12 लाखाची पेन्शन लाटली
निवृत्त लेखपाल वजाहत उल्लाह खान यांचा 2 जानेवारी 2013 रोजी मृत्यू झाला. त्याची पत्नी सबिया बेगम यांचा त्यांच्या आधीच मृत्यू झाला होता. आरोपी मोहसिना हीने मृत पित्याची पत्नी सांगून बोगस कागदपत्रे तयार केली. आणि पेन्शन घेणे सुरु केले होते. आता पर्यंत तिने दहा वर्षांत बारा लाखाची पेन्शन लाटली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पतीने केली तक्रार
मोहसिना हीचे साल 2017 मध्ये फारुक अली याच्याशी लग्न झाले. परंतू त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि त्यांच्यात तलाक झाला. फारुक याला त्याची पत्नी पेन्शन अवैधरित्या मिळवित असल्याचे कळल्यानंतर फारुकने गेल्यावर्षी त्याची बायको सोडून गेल्यानंतर तक्रार केली.
अलिगंज उपविभागीय मॅजिस्ट्रेट कार्यालयाने केलेल्या प्राथमिक तपासात मोहसिना हीने पेन्शनच्या अर्जावर तिच्या आईचे नाव आणि स्वत: चा फोटो लावला होता. या अर्जाची नीट तपासणी न केल्याने तिची चाल यशस्वी झाली. या प्रकरणात अलिगंज पोलिसांनी आयपीएस कलम 420, 467, 468, 471 आणि 409 अंतगर्त गुन्हा दाखल केला.
कर्मचाऱ्यांचीही चौकशी
या प्रकरणात या महिलेचा पेन्शनचा अर्ज मंजूरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही भूमिकाही तपासली जाणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.अतिरिक्त जिल्हा मॅजिस्ट्रेट आलोक कुमार यांनी सांगितले की आरोपीचा पेन्शनचा अर्जाचे व्हेरीफिकेशन आणि अप्रुव्हल प्रोसेसमध्ये अनेक चुका आहेत. या प्रकरणात दोषी कर्मचाऱ्यांवर देखीलवर कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.