Vasai Hospital : वसई विरार महापालिका रुग्णालयात धक्कादायक प्रकार; वार्डात ठेवला 12 तास मृतदेह
वसई विरार महानगरपालिकेचे वसई गावात सर डी. एम. पेटीट हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात 26 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता एक बेवारस मृतदेह आला होता. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी वार्ड क्रमांक 04 मध्ये हा मृतदेह ठेवला होता.
वसई : वसई विरार महानगरपालिकेच्या सर डी.एम.पेटीट रुग्णालया (D.M.Petit Hospital)त तब्बल 12 तास बेवारस मृतदेह (Deadbody) जनरल वॉर्डमध्ये पेशंटच्या शेजारी ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक जागरूक रुग्ण मित्र धिरज वर्तक यांनी ही बाब उघडकीस आणली आहे. यामुळे प्रशासनाच्या या गलथान कारभारावर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा मृतदेह बेवारस होता. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मृतदेह शवागृहात नेण्याऐवजी वॉर्डमध्ये ठेवला. मात्र 12 तास झाले तरी रुग्णालयातील कर्मचारी मृतदेहाकडे फिरकत नव्हते. मृतदेहाला दुर्गंधी सुटू लागली होती. तसेच माशाही फिरु बसू लागल्या होत्या. याचा व्हिडिओ व्हायरल (Video Viral) केल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांची पळापळ सुरु झाली.
मृतदेहावर बसलेल्या माशा, मच्छरमुळे इतर रुग्णांना त्रास
वसई विरार महानगरपालिकेचे वसई गावात सर डी. एम. पेटीट हे रुग्णालय आहे. या रुग्णालयात 26 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता एक बेवारस मृतदेह आला होता. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी वार्ड क्रमांक 04 मध्ये हा मृतदेह ठेवला होता. त्या रुममध्ये तीन ते चार पेशंट होते. दुसऱ्या दिवशी साडे अकरापर्यंत हा मृतदेह त्याच ठिकाणी ठेवला असल्याने त्याच्यावर माशा बसल्या होत्या. याच मच्छर, माशांनी रात्रभर दुसऱ्या रुग्णांना त्रास दिला असल्याचे इतर रुग्णांनी सांगितले आहे. रुग्ण मित्र धिरज वर्तक यांनी या मृतदेहाचा व्हिडीओ काढल्यानंतर तेथील पालिका कर्मचारी यांची पळापळ होऊन मृतदेह इतरत्र हलविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. रुग्णालयाच्या या हलगर्जीपणाबाबत पेशंटच्या नातलगांनी रोष व्यक्त केला आहे. (The deadbody remained in the ward for 12 hours at the Vasai Virar Municipal Hospital)