झटपट पैसे कमावण्यासाठी ते बनले चोर, सराफा व्यापाऱ्याचे तब्बल ‘इतके’ सोने लंपास
ते दोघे कंपनीचे अकाऊंट्स सांभाळत होते. पण कुणाला पुसटशीही कल्पना नव्हती की ते आपले अकाऊंट भरत असतील. पण म्हणतात ना सत्य कधीही लपून राहत नाही.
अभिजीत पोते, पुणे : पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध सराफा व्यापारी चंदूकाका सराफ अॕन्ड सन्स यांना कामगारांनीच गंडा घातल्याची घटना घडली आहे. सोन्याच्या दालनातून तब्बल 106 तोळे सोने कामगारांनीच लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. या सोन्याची किंमत तब्बल 80 लाखापेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. कोमल अनिल केदारी आणि सागर सूर्यकांत नकाते अशी या चोरी करणाऱ्या दोन्ही कामगारांची नावे आहेत. दोघेही दुकानात अकाऊंटंट आहेत. चंदूकाका सराफ अँड सन्स यांचे पुण्यातील मगरपट्टा या ठिकाणी सोन्याचे दालन असून, या दुकानातून लबाडीच्या इराद्याने दोन्ही आरोपींनी हे सगळे कृत्य केलं.
दोघेही आरोपी अकाऊंट्स विभागात कार्यरत
कोमल आणि सागर हे या ठिकाणी अकाउंट्स विभागात काम करतात. दालनात येणाऱ्या सोन्याच्या वस्तू त्याचबरोबर गोठ, गंठण, पाटल्या या सारखे दागिने त्या दोघांनी परस्पर काही फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवले होते. गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या रकमेतून या दोघांनीही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. हा सगळा प्रकार व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर, याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून, त्यांची सखोल चौकशी सुरु आहे.