अधिकाऱ्यांनी वेशांतर केलं, तब्बल दोन दिवस वॉच ठेवला, जेव्हा धाड टाकली तेव्हा समोर आलं मोठं घबाड
नुकतीच नाशिक वनविभागाने केलेल्या कारवाईने रामकुंड परिसरात खळबळ उडाली आहे. जडीबुटीच्या नावाखाली वन्यप्राण्यांचे अवशेष विकले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नाशिक : मागील काही वर्षातील वनविभागाच्या ( Nashik Forest ) कारवाईवरुन वन्य प्राण्यांची तस्करी होण्याचे प्रमाण अधिक वाढल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान नाशिकच्या रामकुंड ( Nashik Ramkund ) परिसरात वनविभागाच्या अधिकाऱ्यानी मोठी कारवाई केली आहे. डब्बल दोन दिवस या कारवाईसाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वेशांतर करून लक्ष ठेवलं होतं. त्यामध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना यामध्ये यश आले असून वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आले आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या कारवाईवरुन जिल्ह्यात तस्करीचं प्रमाण वाढलं ( Nashik Crime ) आहे हे निश्चित झाले आहे.
नुकतीच नाशिक वनविभागाने केलेल्या कारवाईने रामकुंड परिसरात खळबळ उडाली आहे. जडीबुटीच्या नावाखाली वन्यप्राण्यांचे अवशेष विकले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये एकाला अटक करण्यात आली आहे.
नाशिकच्या वनविभागाच्या दक्षता पथकाने ताब्यात घेतलेल्या संशयिताकडून हरणांच्या शिंगाचे तुकडे, साळींदरचे काटे आणि इतर वन्यप्राण्यांचे अवशेष जप्त करण्यात आले आहे.
याशिवाय तीन चार महिन्यापूर्वी आंबोली गाव परिसरातही बिबट्याच्या कातडीच्या तस्करी घटना उघडकीस आली होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने ही कारवाई केली होती.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शहरातील विविध भागात जडीबुटी विकणारे वन्यप्राण्यांच्या अवयवांची तस्करी करून विकत असल्याची माहिती होती. इतकंच काय पूजाचे साहित्य विक्री करणारे देखील यामध्ये सहभागी असल्याचा संशय होता.
त्याचे कारणही तसेच आहे. मागील वर्षी कोल्हापूर येथे वन्यप्राण्यांच्या तस्करीत नाशिकच्या पूजा साहित्य विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. त्यामुळे नाशिकच्या वनविभागाला संशय आला होता.
इतकंच काय दगडू तेली म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यावसायिकाच्या दुकानातही वन्य प्राण्यांचे अवयव कारवाई दरम्यान आढळून आले होते. त्यामुळे नाशिकच्या विविध भागात पूजा पाट करण्यासाठी लागणारे साहित्य विक्री करणारेच रॅकेट चालवत असल्याचा संशय वनविभागाला होता.
त्यानुसार नाशिकच्या रामकुंड परिसरात वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून निरीक्षण करत होते. त्याच दरम्यान एका जडीबुटी विकणाऱ्याला अटक केली आहे.
यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस सापळा रचला होता. त्यामध्ये दक्षता पथकाने वेशांतर करून ही कारवाई केली आहे. पंचवटी परिसरातून संशयित धनेश टेकमला अटक करण्यात आली आहे.
धणेश याच्याकडून मृत स्टार कासवाचे 36 नग खवले, इंद्रजाल 17 नग, साळींदरचे काटे 15 नग, हरणांच्या शिंगाचे तुकडे 06 नग, वन्य प्राणीसदृश्य नखे 08 नग असा मुद्देमाल जप्त केला आहे.