चिमुकलीचं अपहरण करणारी महिला 24 तासात पकडली; लाल साडी आणि गळ्यातील कवड्याच्या माळेमुळे लागला शोध
रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका साडे चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती. पोलीसांनी मोठ्या कौशल्याने या प्रकरणाचा तपास करीत गुप्त माहीतीच्या आधारे या चिमुकलीची सुखरुप सुटका करीत अपहरणकर्त्या महिलेला अटक करण्यात यश मिळविले आहे. अवघ्या 24 तासात चिमुकलीची सुटका झाल्याने पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
गणेश सोनोने, टीव्ही 9 प्रतिनिधी, अकोला | 7 जानेवारी 2023 : अकोल्यात साडे चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले होते. त्यामुळे परिसरात घबराट पसरुन खळबळ उडाली होती. पोलिसांनी अत्यंत सावधानतेने या प्रकरणी पथके नेमून तपास सुरु केला. अखेर चोवीस तासांच्या आत अपहृत साडे चार वर्षीय गुड्डीला शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. आपली मुलगी सुखरुप परत आल्याने तिच्या आईचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. या प्रकरणात आरोपी महिलेचा लाल रंगाच्या साडीवरुन छडा लागला असून तिच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
रामदास पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एक चिमुकली अचानक गायब झाल्याने तिच्या पालकांनी शोधाशोध केली तरी ती न सापडल्याने ते हवालदील झाले. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. रामदासपेठ पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास सुरु केला. तपासासाठी विविध पथके नेमण्यात आली. आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासण्यात आले. अखेर पोलिसांना त्यांच्या बातमीदारांकडून लाल साडीच्या महिलेने या चिमुकलीला चॉकलेट दिल्याचे कळले. त्यानंतर या वर्णनाच्या महिलेचा शोध सुरु झाला.
अखेर असा लागला छडा
पोलिसांनी बाजार, बस स्टॅंड, हॉटेल, लॉज सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली. आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली, तेव्हा लाल रंगाची साडी घातलेली महिला आढळून आली. या महिलेच्या डोळ्यांमध्ये सुरमा, एका पायात काळा धागा आणि गळ्यात कवडीच्या माळा घातलेल्याय होत्या. महिला धार्मिक स्थळांच्या परिसरात भीक मागणारी असल्याचे निष्पन्न झाले. आणि त्या दिशेने रामदास पेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी या महिलेचा शोध सुरु केला आणि ही महिला शहरातील बॉंबे लॉजच्या परिसरात आढळून आली. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेवून लपवून ठेवलेल्या चिमुकलीची सुटका केली. या महिलेने या चिमुकलीचे कोणत्या उद्देशाने अपहरण केले याचा तपास रामदास पेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखा करीत असल्याचे पोलिस निरीक्षक मनोज बहुरे यांनी सांगितले. 24 तासांच्या आत या चिमुकलीची सुखरूप सुटका केल्याने पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षा होत आहे !