पावसाच्या पाण्याने पाय घसरुन पडला, रस्ता नसल्याने तीन फूट पाण्यातून अंत्ययात्रा निघाली
बुलडाण्यातील एका गावात गावकऱ्यांना विचित्र गोष्टीला सामोरं जावं लागतंय. या गावातील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी पूल नसल्याने त्यांना पाण्यातूनच चालत जावून प्रवास करावा लागतोय. विशेष म्हणजे याच गोष्टीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला.
बुलडाणा : ‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सूटका, जगण्याने छळले होते’, असं ज्येष्ठ कवी सुरेश भट त्यांच्या एका गझलमध्ये म्हणाले होते. त्यांची ही गझल खूप मनाला भिडते. प्रत्येकाच्या आयुष्यात नियतीने संघर्ष लिहिलेला असतो. प्रत्येकजण संघर्ष करतो. अनेकांचं संघर्ष करण्यातच आयुष्य जातं. पण जेव्हा देहातून जीव निघून जातो, तेव्हा सगळं जागेवरतीच राहून जातं. फक्त राहतात त्या आपल्या संबंधिच्या इतरांच्या मनात असलेल्या आठवणी. त्यामुळे सुरेश भट मरणाने संघर्षापासून सुटका केली, असं म्हणाले होते. ते खरं असलं तरी बुलडाण्यातील एका गावात गावकऱ्यांना विचित्र गोष्टीला सामोरं जावं लागतंय. या गावातील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी पूल नसल्याने त्यांना पाण्यातूनच चालत जावून प्रवास करावा लागतोय. विशेष म्हणजे याच गोष्टीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच पाण्यातून त्याची अंत्ययात्रा देखील निघाली. त्यामुळे या घटनेवर हळहळ व्यक्त केली जात आहे.
नेमकं काय घडलं?
संबंधित घटना ही शेगाव तालुक्यातील महागाव येथे घडली आहे. या गावातील गावकऱ्यांना जगताना यातना सोसाव्या लागत आहेतच पण या जगाचा निरोप घेतल्यानंतरही माणसाच्या नशिबी त्रास आणि विटंबना येतेय. विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली. पण गावकऱ्यांना गावाबाहेर जाण्यासाठी पूल नसल्याने होणारा त्रास हा पाचविलाच पुजलेला आहे. पूल नसल्याने पाण्यातून रस्ता ओलांडणाऱ्या गावातील व्यक्तीचा 11 सप्टेंबर रोजी पाय घसरला आणि तो पडला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरु होते. पण जवळपास 18 दिवसांच्या उपचारानंतरही त्याची प्राणज्योत मालवली.
तीन फुट पाण्यातून अंत्ययात्रा निघाली
संबंधित तरुणाचं काल (28 सप्टेंबर) संध्याकाळी निधन झाले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी या युवकाचा पाय घसरुन अपघात झाला होता अगदी त्याच ठिकाणावरुन त्याचे प्रेत उचलून न्यावे लागले. अंत्यसंस्कार करण्यासाठी गावकऱ्यांना अक्षरश: तीन फुट पाण्यातून जावे लागले. या घटनेमुळे या भागातील रस्ता आणि पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
स्मशानभूमीच्या फाटक्या छतामुळे पावसातच अंत्यविधी
दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये गेल्या सहा दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथील स्मशानभूमीचे छत कुजल्यामुळे फाटलं आहे. त्यामुळे भर पावसातच अंत्यविधी करावा लागल्याची घटना तिथे घडली आहे. खरंतर वडापूर ग्रामपंचायतीलला विविध विकास कामांसाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, ग्रामपंचायतीकडून दलित वस्ती स्मशानभूमीकडे सातत्याने दुर्लक्ष केल जातं असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून याची दाखल घेऊन दलित वस्ती स्मशानभूमीचा कायापालट होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :
पाकिस्तानातून आलो, ISI ने 20 हजार दिले, उरीमध्ये नाल्यात लपलो, जिवंत पकडलेल्या दहशतवाद्याचे खुलासे
पुणे ते सोलापूर, चार जिल्ह्यात 18 लाखांच्या 31 बाईक्सची चोरी, पंढरपुरात रॅकेटचा पर्दाफाश