गौतम नवलखांचा जामीन फेटाळण्याचा एनआयए कोर्टाचा आदेश रद्द; नव्याने सुनावणी घेण्याचे हायकोर्टाचे निर्देश
गौतम नवलखा यांना जामीन नाकारणारा मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष एनआयए न्यायालयाने दिलेला आदेश मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. विशेष एनआयए कोर्टाला नवलखा यांच्या जामीन याचिकेवर 4 आठवड्यात नव्याने पुनर्विचार करून निर्णय देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले.
मुंबई / ब्रिजभान जैस्वार : भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणात आरोपी असलेले गौतम नवलखा यांना गुरुवारी उच्च न्यायालयाने अंशतः दिलासा दिला. सत्र न्यायालयातील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता. तो आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला असून, नवलखा यांच्या जामीनअर्जावर नव्याने सुनावणी घेण्याचे निर्देश विशेष एनआयए न्यायालयाला दिले आहेत. नवलखा हे ऑगस्ट 2018 पासून न्यायालयीन कोठडीत असून विशेष एनआयए न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
विशेष न्यायालयाच्या आदेशावर नाराजी
नवलखा यांच्या जामीन अर्जावर न्या. अजय गडकरी आणि न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने विशेष न्यायालयाच्या आदेशावर नाराजी व्यक्त केली. सरकारी पक्षाने सादर केलेल्या पुराव्यांबाबत विशेष न्यायालयाने आपल्या निकालपत्रात योग्य प्रकारे विश्लेषण केल्याचे दिसून येत नाही, असे खंडपीठाने व्यक्त केले.
नव्याने चार आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्याचे आदेश
जामीन फेटाळताना न्यायालयाने कोणत्याही स्वरुपाचे स्पष्ट कारण दिलेले नाही. बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्याच्या कलम 43 डी (5) अन्वये जामीन फेटाळताना अशा प्रकारचे कारण देणे गरजेचे होते. त्याचबरोबर नवलखा यांचा जामीन अर्ज फेटाळताना जहूर अहमद शाह वताली प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचाही विशेष एनआयए न्यायालयाने विचार केलेला नाही, अशी विविध निरीक्षणे नोंदवत उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने गुरुवारी नवलखा यांच्या जामीन अर्जाचे प्रकरण नव्याने सुनावणीसाठी विशेष एनआयए न्यायालयाकडे माघारी पाठवले. याचवेळी चार आठवड्यांत सुनावणी पूर्ण करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत.