तुरुंगात टाकणारे जेव्हा तरुंगात जातात, तुरुंगाधिकारी न्यायालयाला शरण
२०१७ मध्ये नाशिक रोड कारागृहात कर्तव्यावर असलेले तुरुंगाधिकारी श्यामराव अश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे आणि वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांच्यावर आरोप करण्यात आले होते.
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन तुरुंगाधिकाऱ्यांनाच (jail Ofiicer) तुरुंगात जाण्याची वेळी आली आहे. तुरुंगात असलेल्या कैद्यांची रेकॉर्डवरील शिक्षा कमी करण्यासाठी, पॅरोल मंजूर करण्यासाठी लाखो रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आलेले हे तुरुंगाधिकारी आहे. अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी या अधिकाऱ्यांनी न्यायालयात (Court) धाव घेतली होती. मात्र,न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने नाशिकरोड पोलिसांना या अधिकाऱ्यांना शरण जावे लागले आहे. त्यानंतर आता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र, यातील तिसऱ्या संशयित आरोपीने उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेला आहे.
२०१७ मध्ये नाशिक रोड कारागृहात कर्तव्यावर असलेले तुरुंगाधिकारी श्यामराव अश्रुबा गीते, माधव कामाजी खैरगे आणि वरिष्ठ लिपिक सुरेश जयराम डबेराव यांच्यावर आरोप करण्यात आले होते.
यामध्ये नाशिकरोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तीन कैद्यांना शिक्षेचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी लाच घेऊन कारागृहातून बेकायदेशीर पणे सोडल्याचा आरोप होता.
हा प्रकार कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर कारागृह महासंचालकांनी अंतर्गत चौकशी सुरू केली होती. त्यानुसार तीन अधिकारी, कर्मचारी दोषी आढळून आले होते.
तुरुंगाधिकारी सतीष गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एप्रिल 2022 मध्ये नाशिकच्या नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शिक्षा भोगत असलेल्या बंदीवान आणि त्यांच्या नातलगांकडून लाच घेऊन शिक्षा कमी करून त्यांना तात्पुरत्या स्वरूपात शिक्षा कमी आणि मुक्त केल्याची नोंद खाडाखोड करून करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले होते.
व्यंकट रामलू व्यकटया या कैद्याला रजा देण्यात आली. परंतु हा ठरवून दिलेल्या वेळेत हजर झाला नाही, 3 हजार 435 दिवस उशिराने हजर झाला. मात्र, नोंदवहीमध्ये 2 हजार 706 दिवसांनी हजर झाल्याची नोंद केली.
विलास बाबू शिर्के यास माफिच्या दिवसांची नोंद 1 हजार 407 असताना खाडाखोड करुन 2हजार 127 दिवसांची नोंद करून कारागृहातून मुक्त केले आहे.
राजलिंगम गुंटूका याला 14 दिवसाची रजा मंजूर असताना 409 दिवस फरार होता, पोलिसांनी हजर केले मात्र नोंदवही मध्ये केवळ 44 दिवस उशीराने हजर झाल्याची नोंद करण्यात आली.