पती बेरोजगार, सासूकडून छळ; कंटाळलेल्या विवाहितेने उचलले ‘हे’ टोकाचे पाऊल
23 सप्टेंबर रोजी धाकड कुटुंबीयांनी त्यांची 15 दिवसाची जुळी मुले बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
भोपाळ : भोपाळमध्ये बेपत्ता झालेल्या जुळ्या मुलांचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले आहे. या चिमुकल्यांची हत्या (Murder) करुन मृतदेह झाडीत फेकण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे आईनेच घरगुती त्रासाला (Domestic Violence) कंटाळून मुलांना संपवल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपी आईला अटक (Arrest) केली आहे. सपना धाकड असे आरोपी महिलेचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
सपनाचा 2017 मध्ये बृजमोहन धाकडशी झाला होता. दोघांना आधीच एक मुलगी होती. सहा महिन्यांपूर्वी बृजमोहनचा अपघात झाला होता. यानंतर तो बेरोजगार होता. त्यातच सपनाला पुन्हा जुळी मुले झाली.
आधीच गरिबीत दिवस काढत असल्याने या मुलांचे पालनपोषण कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला.महिलेचा मोठा दीर घरखर्च चालवायचा. यामुळे आर्थिक समस्येतून घरामध्ये दररोज भांडणे होत असत. महिलेची सासू दररोज तिला टोमणे मारायची.
घटनेच्या एक दिवस आधीही महिलेचे सासू, सासरे आणि पतीसोबत भांडण झाले होते.
चार दिवसांपूर्वी मुले बेपत्ता झाल्याची दिली होती तक्रार
23 सप्टेंबर रोजी धाकड कुटुंबीयांनी त्यांची 15 दिवसाची जुळी मुले बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. माहेरी जात असताना वाटेत मुले गायब झाली, असे महिलेने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
चार दिवस महिला पोलिसांची दिशाभूल करत होती. लगातार काऊन्सिलिंग आणि तज्ज्ञांच्या मदतीने सपनाची चौकशी केली असता तिने हत्येची कबुली दिली. घरातील वादाला कंटाळून महिलेनेच मुलांना संपवले आणि झाडीत फेकल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांना घटनास्थळी नेत मुलांचे मृतदेह दाखवले.