मुंबई : रस्ते अपघात, दुर्घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस नेहमीच प्रयत्नशील असतात. यासाठी वेळोवेळी वाहनचालकांमध्ये जनजागृतीही केली जाते. मात्र अनेकदा वाहन चालक वाहतुकीचे नियम मोडताना दिसतात. यामुळे रस्ते दुर्घटनेच्या घटना घडतात. यामुळे वाहतूक पोलिसांनी आता कठोर पावले उचलली आहेत. आता रस्त्याने राँग साईडने गाडी चालवल्यास कठोर कारवाई होणार आहे. राँग साईडने गाडी चालवल्यासे गुन्हा करुन थेट लायसन्स रद्द करण्यात येणार येत आहेत. बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.
वाहन चालक वाहतुकीचे नियम सर्रास धाब्यावर बसवत असल्यामुळे मुंबईत अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. बहुसंख्य वाहन चालक वन वे वर विरुद्ध दिशेने वाहन चालवून नियम पायदळी तुडवताना दिसतात. बेशिस्त वाहन चालकांच्या यादीत मुंबईकर आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांना शिस्त लावण्यासाठी मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.
उलट दिशेने वाहन चालवणाऱ्यांकडून अनेकदा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा जीव जाण्याच्या घटना घडतात. भारतीय दंड संहिता कलम 279 चा आधार घेऊन अशा वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. उलट दिशेने वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांवर चौकाचौकात तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून ही कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करून उलट दिशेने वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांचे लायसन्स जप्त करण्यात येत असून, वाहन चालवण्याचा परवानाच रद्द करण्याची शिफारस केली जाणार आहे.