गावठी कट्टा बाळगण्याचा छंद का जडतोय? कॉलेज परिसरात पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक केल्यानं खळबळ
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षय नाईकवाडे हा तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे मिळाली होती.
नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये गावठी कट्टे आणि तलवारी बाळगणाऱ्यावर कारवाई केल्याचे पोलिसांकडून जाहीर केले जात आहे. मात्र, गावठी कट्टे, तलवारी शहरात येतात कुठून ? हे पुरवणारे आहेत तरी कोण ? इतर राज्यांचं कनेक्शन यामध्ये आहे का ? याचा शोध घेतला जातो की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. त्याचे कारण म्हणजे अवघ्या 25 वर्षीय तरुणाकडे जीवंत काडतुस आणि गावठी कट्टा आढळून आला आहे. हे बाळगण्याची किंवा त्यामागील कुणाला मारण्याचा त्याचा उद्देश होता का ? याबाबत पोलीसांनी स्पष्ट केले नसले तरी या कारवाईवरुन अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सराईत गुन्हेगाराकडे जीवंत काडतुस आणि गावठी कोणत्या कारणासाठी होता? कॉलेज परिसरात त्याचा वावर असल्याने कुणा विद्यार्थ्याच्या जीवाला धोका होता का? कॉलेज परिसरात गुंडगिरी फोफावली आहे का? सराईत गुन्हेगार असतांना गावठी कट्टा त्यांच्याकडे येण्याचा मार्ग कोणता आहे? अशा विविध प्रश्नांची उत्तरे पोलिसांना शोधावी लागणार आहे.
नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षय नाईकवाडे हा तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांना गुप्त माहितीच्या आधारे मिळाली होती.
विष्णु गोसावी आणि सागर आडगे या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी माहितीच्या आधारे सापळा रचत त्याची चौकशी सुरू केली होती, त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता.
त्याच दरम्यान पोलीसांनी पाठलाग करून त्याची झडती घेतली, त्यामध्ये जीवंत काडतुस आणि गावठी कट्टा आढळून आला आहे, जवळपास पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे.
नाशिकरोड पोलीस कर्मचाऱ्यानी केलेल्या या कारवाईचे पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी याबाबत कारवाईबद्दल पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे स्वागत केले आहे.
मात्र, शहराची सुरक्षा बघता, घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना बघता पोलीसांनी अभिनंदन झाल्यावर थांबून चालणार नाहीये, गावठी कट्टे शहरात कसे येतात ? याचा शोधून घेऊन थेट कारवाई करणे गरजेचे झाले आहे.