दोन हजार कोटींचं ड्रग्ज प्रकरण, अंबरनाथच्या केमिकल कंपनीच्या मालकाला अटक
सिंगने दिलेल्या माहितीनुसार अँटी नार्कोटिक्स सेलनं या कंपनीवर छापा टाकला होता. तेव्हापासून या कंपनीचा मालक असलेला जीनेंद्र व्होरा हा अँटी नार्कोटिक्स सेलच्या रडारवर होता.
अंबरनाथ : मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेल (Anti Narcotics Cell)नं मागील महिन्यात दोन हजार कोटी रुपयांच्या ड्रग्ज (Drugs) प्रकरणाचा भांडाफोड केला होता. या प्रकरणात अंबरनाथ एमआयडीसीतील एका केमिकल कंपनीच्या मालका (Chemical Company Owner)ला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलनं ऑगस्ट महिन्यात नालासोपारा आणि गुजरातमधून मिळून 1 हजार 218 किलो एमडी ड्रग्ज जप्त केलं होतं. या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या प्रेम प्रकाश सिंग याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.
मुख्य सूत्रधार प्रेम पवार केमिस्ट्रीचा पदवीधर
विज्ञान शाखेतील ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पदवीधर असलेला सिंग हा स्वतः हा ड्रग्ज तयार करत होता. त्याच्या चौकशीत त्यानं अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील नमाऊ केम या केमिकल कंपनीत ड्रग्ज तयार केल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
सिंगने दिलेल्या माहितीनुसार कंपनीवर छापा
सिंगने दिलेल्या माहितीनुसार अँटी नार्कोटिक्स सेलनं या कंपनीवर छापा टाकला होता. तेव्हापासून या कंपनीचा मालक असलेला जीनेंद्र व्होरा हा अँटी नार्कोटिक्स सेलच्या रडारवर होता.
अखेर त्याच्याविरोधात सबळ पुरावे मिळताच पोलिसांनी त्याला 10 सप्टेंबर रोजी चौकशीसाठी बोलावत बेड्या ठोकल्या. त्याच्या कंपनीतील व्यवस्थापक किरण पवार याला अँटी नार्कोटिक्स सेलनं यापूर्वीच बेड्या ठोकल्या आहेत.
कंपनी मालकाला 10 दिवसांची पोलीस कोठडी
दरम्यान, व्होरा याला विशेष एनडीपीएस कोर्टासमोर हजर करण्यात आलं असता त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई अँटी नार्कोटिक्स सेलचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी याबाबत माहिती दिली.
ड्रग्ज बनवण्याच्या मोबदल्यात सिंग व्होराला मोठी रक्कम द्यायचा
व्होरा याच्या कंपनीत प्रेम प्रकाश सिंग यानं चार वेळा एमडी ड्रग्ज तयार केलं. त्या मोबदल्यात व्होरा याला मोठी रक्कम दिली गेली. तसंच कंपनीतील कर्मचाऱ्यांना याबाबत संशय आला होता. मात्र याची माहिती व्होरा आणि त्याचा व्यवस्थापक किरण पवार याने कर्मचाऱ्यांनाही दिली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याच नमाऊ केम कंपनीतून एमडी ड्रग्जचे काही नमुने जप्त केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. या प्रकारामुळे केमिकल कंपन्यांवर करडी नजर ठेवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.