सांगली : पालघरमधील साधूंच्या हत्याकांडाने दोन वर्षापूर्वी संपूर्ण देशभर खळबळ उडवून दिली. त्या घटनेचे पडसाद अजूनही उमटत आहेत. अशातच आता सांगली जिल्ह्यातही निष्पाप साधूंना मारहाण (Beating to Saint) केली गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. साधूंना मुले चोरणारी टोळी (Child Stealing Gang) समजून बेदम मारहाण करण्यात आली. जत तालुक्यातल्या लवंगा येथे ही घटना घडली आहे. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करुन साधूंची सर्व माहिती तपासून त्यांची सुटका (Rescued) केली.
लवंगा गावच्या ग्रामस्थांनी मूळच्या उत्तर प्रदेशातील असलेल्या चौघा साधूंना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.
पालघरमधील मॉब लिचिंगचे प्रकरण अजून ताजे असतानाच ही घटना घडल्याने त्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
मारहाण करण्यात आलेले साधू हे कर्नाटकमधून जत मार्गे पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. ते लवंगा गावच्या हद्दीत आले, तेव्हा गावात लहान मुले चोरणारी टोळी शिरल्याची अफवा उठली. त्यातून सगळीकडे खळबळ उडाली.
लोकांनी चार साधूंना पकडून बेदम मारहाण सुरु केली. त्यांच्या या मारहाणीचा अज्ञात व्यक्तीने बनवलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने मारहाणीवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
मारहाणीप्रकरणी साधूंनी उमदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हे साधू कर्नाटकमधून जतवरून पंढरपूरला जात होते. याचदरम्यान ते रस्ता चुकले. त्यामुळे एका साधूने लवंगा गावातील मुलाला पत्ता विचारला.
लवंगा गावातील लोकांना वाटले की ही मुले चोरणारी टोळी आहे. त्याच गैरसमजातून नागरिकांनी त्या चार साधूंना बेदम मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे.
घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्या सर्व साधूंची आधार कार्ड घेऊन सर्व माहिती तपासली. त्यानंतर साधूंची सुटका करण्यात आली.
हा प्रकार गैरसमजुतीतून झाला असून त्याबाबत साधू आणि ग्रामस्थांकडून लेखी माहिती घेतली आहे. पोलिसांनी सर्व साधूंना देवदर्शनासाठी पंढरपूरला रवाना केले आहे.