Varanasi Tripple Murder : तिहेरी हत्याकांडाने वाराणसी हादरले !, कारण काय? गूढ कायम
एकाच कुटुंबातील महिला व तिचा मुलगा आणि मुलीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. हे हत्याकांड भरवस्तीत घडल्याने राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वाराणसी : उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. कौटुंबिक वाद आणि व्यावसायिक वैमनस्यातून रक्तरंजित घटना घडत आहेत. याचदरम्यान वाराणसी जिल्ह्यामध्ये तिहेरी हत्याकांडाने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. एकाच परिवारातील तिघांची हत्या करण्यात आली. मात्र ही हत्या कोणी केली? यामागे कारण काय? हे सर्व प्रश्न अनुत्तरीतच आहेत. पोलिसांपुढे हत्याकांडाचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान असून, मारेकरी फरार असल्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच कुटुंबातील महिला व तिचा मुलगा आणि मुलीची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. हे हत्याकांड भरवस्तीत घडल्याने राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या हत्याकांडामागे मालमत्ता वादाचा संशय वर्तविला जात असला तरी त्या अनुषंगाने ठोस पुरावे हाती लागलेले नाहीत. त्यामुळे हे हत्याकांड परिचयातील व्यक्तीने केले की चोरीच्या हेतूने दरोडेखोरांनी हा गुन्हा केला, अशा विविध तर्काच्या आधारे उत्तर प्रदेशचे पोलीस अधिक तपास करीत आहेत.
हत्या झालेल्या महिलेच्या जावयावर संशय
तिहेरी हत्याकांड घडलेल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे पोलिसांपुढे तपासाचे आव्हान आहे. मात्र हत्या झालेल्या महिलेचा गेल्या काही दिवसांमध्ये कुणाकुणाशी वाद झाला होता, याचा तपास पोलीस स्थानिक रहिवाशांच्या मदतीने करत आहे.
55 वर्षीय राणी हिचा पती कुटुंबापासून वेगळा राहतो. महिलेचा पती भोलानाथ आणि मोठा मुलगा दुसरीकडे राहतात. अशाप्रकारे एक कुटुंब दोन ठिकाणी राहत असल्यामुळे सुरुवातीला आसपासच्या लोकांना पतीवरही संशय आला होता. मात्र हत्याकांड झाल्यानंतर महिलेच्या जावयाचा ठावठिकाणा नसल्यामुळे त्याच्यावर संशय घेतला जात आहे.
हत्याकांडाच्या आदल्या दिवशी जावई आला होता घरी
हत्याकांड घडण्याच्या आदल्या दिवशी महिलेचा जावई तिच्या घरी आला होता. तसेच तिहेरी हत्याकांड घडल्यानंतर त्याचा मोबाईल देखील स्विच ऑफ झाला आहे. त्याचबरोबर तो घरातून बाहेर गेल्यानंतर मागे परतलेला नाही.
या सर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जावई संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या अनुषंगाने पोलीस सध्या महिलेच्या आणि जावयाच्या नातेवाईकांकडे अधिक चौकशी करू लागले आहेत. या जावयाला ताब्यात घेतल्यानंतर हत्याकांडाचे गूढ उकलले जाईल, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.