वनकर्मचारी-गावकऱ्यांचा संघर्ष टोकाला; वनरक्षकाला गावकऱ्यांनी ठोकले, कारण काय?
वनरक्षक नितेश राऊत हा त्याच्याकडे अत्यंत भेदरलेला व चिखलाने माखलेल्या अवस्थेत आला. यावेळी त्यास याबाबत विचारणा केली असता त्याने आपबिती सांगितली.
गोंदिया : जंगल परिसरात वनकर्मचारी आणि गावकरी यांच्यात वाद होत असतात. या वादातून काही दुर्घटना घडतात. जंगलातील वन्यजीव शेतात येतात. शेतकऱ्याचे नुकसान करतात. यावर वनविभाग काही करू शकत नाही. पण, गावकरी जंगलात गेले. तर त्यांच्यावर निर्बंध आहेत. जंगलातील लाकडं आणायचे नाही. जनावर जंगलात चारायला न्यायचे नाही. असे निर्बंध गावकऱ्यांवर लादले जातात. यातून हा संघर्ष आणखी पेटतो. अशाच कारणामुळे असे संघर्ष होताना दिसतात. गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा वनविभागात येत असलेल्या नागझिरा वनक्षेत्रात कार्यरत असलेल्या वनरक्षकाला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याची मोटारसायकल जाळल्याची घटना उघडकीस आली. नितेश मनोहर राऊत ( 29, रा. झांजीया ) असे मारहाण करण्यात आलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.
नितेश भेदरला होता
याप्रकरणी नितेशचा मित्र वनरक्षक अमित मुलचंद नाईक (रा. तिरोडा ) याने तिरोडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून तिरोडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. फिर्यादीचा मित्र वनरक्षक नितेश राऊत हा त्याच्याकडे अत्यंत भेदरलेला व चिखलाने माखलेल्या अवस्थेत आला. यावेळी त्यास याबाबत विचारणा केली असता त्याने आपबिती सांगितली.
दुचाकीही पेटवून दिली
नितेश झांजीयावरून दुचाकीने तिरोड्याकडे येत होता. त्यावेळी इंदोरा खुर्द गावाजवळील वाघदेव परिसरात बोदलकसा तलावाच्या बाजूच्या डांबरी रस्त्यावरील त्याची दुचाकी अडवण्यात आली. पाच-सहा व्यक्तींनी त्याची दुचाकी अडवून शिवीगाळ करून थापड बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दुचाकीही पेटवून दिल्याचे सांगितले.
म्हणून दाखल केली तक्रार
घटनेनंतर नितेश राऊत अत्यंत घाबरला. दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार देऊ असे म्हणत रात्री दोघेही झोपी गेले. मात्र, पहाटे नितेश परत येतो, असे म्हणून निघून गेला. परंतु, परत आला नाही. यावर फिर्यादी वनरक्षक अमित नाईक याला संशय आला. त्यामुळे त्याने तिरोडा पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली. यावर तिरोडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. नितेश राऊत हे २९ वर्षांचे आहेत. ही घटना १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर हनवते करत आहेत.