काळ्या रंगावरुन टोमणे मारायचा पती, संतापलेल्या पत्नीने जे केले ते पाहून अंगावर येईल !
घटनेनंतर गुन्ह्यात वापरलेले हत्यार महिलेने अंगणातील विहिरीत फेकून दिले. तसेच रक्ताने माखलेली साडी पलंगाखाली लपवून ठेवली.
बिहार : काळ्या रंगावरुन टोमणे (Taunt) मारणाऱ्या पतीची महिलेने निर्दयीपणे हत्या (Murder) केल्याची घटना रविवारी रात्री बिहारमध्ये उघडकीस आली आहे. अमलेश्वर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक (Arrest) केली आहे. अनंत सोनवानी असे हत्या करण्यात आलेल्या 40 वर्षीय पतीचे नाव आहे. तर संगीता सोनवानी असे हत्या करणाऱ्या आरोपी पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी महिलेने गुन्ह्यात वापरलेले हत्यारही जप्त केले आहे.
काय आहे प्रकरण ?
अनंत सोनवानी हा नेहमी पत्नी संगीताला तिच्या काळ्या रंगावरुन टोमणे मारायचा. तिला मारहाण करायचा. घरातून हाकलून देण्याची धमकी द्यायचा. यामुळे संगीता वैतागली होती.
महिलेच्या पतीने नेहमीप्रमाणे रविवारी रात्री तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि तिला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पतीच्या या कृत्यामुळे महिलेला राग आला आणि तिने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला, त्याच त्याचा मृत्यू झाला.
हत्येनंतर हत्यार विहिरीत फेकले
महिला एवढ्यावरच थांबली नाही, तिने पतीचे गुप्तांगही कापले. घटनेनंतर गुन्ह्यात वापरलेले हत्यार महिलेने अंगणातील विहिरीत फेकून दिले. तसेच रक्ताने माखलेली साडी पलंगाखाली लपवून ठेवली.
सोमवारी सकाळी 6.30 च्या दरम्यान पोलीस कंट्रोल रुमला कापसी गावातील अनंत सोनवानी यांची हत्या झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच अमळेश्वर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता खोलीत अनंतचा मृतदेह आढळला.
घटनास्थळाची पाहणी करताना पोलिसांना संशय आला
पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा अनंतची पत्नी आणि मुलगी मृतदेहाजवळ बसल्या होत्या. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना घरातीलच व्यक्तीने ही हत्या केल्याचा संशय आला.
चौकशीत पत्नीकडून हत्येची कबुली
चौकशी दरम्यान पत्नी संगीतावर पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तिची कसून चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. महिलेच्या सांगण्यावरून पोलिसांनी हत्येत वापरलेले हत्यार आणि साडी जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचा पती अनंत सोनवानी हा तिला नेहमी तिच्या रंगावरून टोमणे मारायचा आणि काळी-काळी म्हणून हाक मारायचा. त्यामुळे ती खूप वैतागली होती. यासोबतच आरोपी तिला वारंवार मारहाण करून घर सोडून जाण्यास सांगत असे.
याचा रागातून संगीताने त्याच्यावर हल्ला करत त्याला संपवले. पोलिसांनी आरोपी महिला संगीता सोनवनीवर हत्या आणि पुरावे लपविल्याच्या आरोपाखाली कारवाई केली आहे.