तापी नदीत उडी घेत तरुणाची आत्महत्या, बुडतानाची घटना कॅमेऱ्यात कैद
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथील सुरेंद्र राजपूत हा आज सायंकाळी डिस्कवर कंपनीच्या मोटरसायकलीने गिधाडे गावाजवळील तापी पुलावर आला.
धुळे : शिरपूर ते शिंदखेडा रस्त्यावरील तापी नदीपुलावरुन 24 वर्षीय तरुणाने तापी उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज सायंकाळी घडली आहे. पुलावरून जाणाऱ्या प्रवाशाने तरुणाचा बुडतानाचा व्हिडीओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे. रात्री उशिरापर्यंत नदीत तरुणाचे शोधकार्य सुरु होते. सुरेंद्र सरदारसिंग राजपूत असे आत्महत्या करणाऱ्या 24 वर्षीय मुलाचे नाव आहे.
तापी नदीत उडी घेत संपवले जीवन
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर तालुक्यातील टेंभे बुद्रुक येथील सुरेंद्र राजपूत हा आज सायंकाळी डिस्कवर कंपनीच्या मोटरसायकलीने गिधाडे गावाजवळील तापी पुलावर आला. पुलावर मोटरसायकल उभी करुन त्याने तापी नदीत उडी घेतली.
एका प्रवाशाने पाहिल्यानंतर आरडाओरडा केला
पुलावरुन वाहतूक करणाऱ्या एका प्रवाशाने त्याला उडी घेताना बघितल्यानंतर आरडाओरडा केला. प्रवाशाचा आरडाओरडा ऐकून घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली. यादरम्यान तो पाण्यात बुडत असतानाचा व्हिडीओ यावेळी एका प्रवाशाने काढला.
रात्री उशिरापर्यंत सुरु होता शोध
सदर मोटारसायकलवरुन तरुणाची ओळख पटली. घटनास्थळी टेंभे येथील ग्रामस्थांसह नागरिकांनी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत तापी नदीत तरुणचा शोध सुरु केला. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. रात्री तापी पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
मार्केटिंगचे काम करायचा तरुण
सुरेंद्र राजपूत हा कृषी क्षेत्रातील कंपनीत मार्केटिंगचे काम करत होता. दरम्यान, त्याने आत्महत्या का केली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत.