जितेंद्र पाटील, TV9 मराठी, पालघर : अज्ञात कारणातून लहान भावाने मोठ्या भावाचा जीव घेतल्याची (Brother Killed Brother) धक्कादायक घटना पालघरमधील जव्हार तालुक्यात (Javhar Taluka in Palghar) उघडकीस आली आहे. पंकज सोन्या वाजे असे 25 वर्षीय मयत भावाचे नाव आहे. हत्येनंतर आरोपी फरार झाला आहे. याप्रकरणी जव्हार पोलीस ठाण्यात (Javhar Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
जव्हार तालुक्यातील न्याहाले खुर्द चामील पाडा येथे वाजे कुटुंबीय राहतात. पंकज सोन्या वाजे हा कुटुंबातील मोठा भाऊ तर निवृत्ती सोन्या वाजे हा लहान भाऊ आहे. दोन भावांमध्ये कोणत्या कारणावरुन वाद होते. याच वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा काटा काढला.
पंकज वाजे हा वसई येथे एका खाजगी कंपनीत कामाला होता. नेहमीप्रमाणे शुक्रवारी सकाळी तो आपली दुचाकी घेऊन कामावर चालला होता. यावेळी त्याचा लहान भाऊ निवृत्तीने त्याचा पाठलाग करत त्याच्यावर मागून हल्ला केला. यात पंकजचा जागीच मृत्यू झाला.
भावाची हत्या केल्यानंतर आरोपी निवृत्ती हा जंगलात फरार झाला. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जव्हार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.
जव्हार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे. दोघा भावांमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद होता याबाबत अद्याप कळू शकले नाही. जव्हार पोलीस मयताच्या नातेवाईकांची चौकशी करत आहेत. तपासाअंतीच हत्येचे कारण स्पष्ट होईल. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.