Ahmednagar Crime : आधी ठरलेले लग्न मोडलं, मग गावातील प्रतिष्ठित व्यक्तींचा त्रास असह्य, अखेर तरुणाने…
ठरलेले लग्न मोडल्याने तरुण संतापला. ज्या तरुणाशी त्याच्या इच्छित वधूचा विवाह ज्या तरुणाशी ठरला होता, त्याला त्याने शिवीगाळ केली. यानंतर गावातील प्रतिष्ठित व्यक्तींनी या प्रकरणी हस्तक्षेप केला आणि भलतंच घडलं.
अहमदनगर / 30 ऑगस्ट 2023 : नगरमध्ये रक्षाबंधनाच्या दिवशीच एख भयंकर घटना उघडकीस आली आहे. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या त्रासाला कंटाळून एका 32 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन सिताराम खुळे असे मयत तरुणाचे नाव आहे. तालुक्यातील कोल्हेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. या घटनेमुळे मयत तरुणाचे नातेवाईक आक्रमक झाले आहेत. आरोपींना अटक झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
नितीनचे लग्न ठरले होते. मात्र मुलीच्या घरच्यांनी लग्नाला नकार दुसऱ्या तरुणासोबत मुलीचे लग्न जमवले. यामुळे नितीन संतापला आणि ज्या तरुणासोबत मुलीचे लग्न ठरवले होते, त्या तरुणाला त्याने शिवीगाळ केली. यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक अमोल अप्पासाहेब दिघे, राजेंद्र देवराम दिघे, जालिंदर मच्छिंद्र दिघे, राहुल भास्कर दिघे, सुधाकर बलसाने यांनी नितीनला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून दमदाटी केली.
ग्रामपंचायत कार्यालयातून नितीन थेट जंगलात गेला आणि जीवन संपवले. मृत्यूपूर्वी त्याने डायरीत प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, बाजीराव दिघे (उपसरपंच), नानासाहेब कोल्हे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे यांना मृत्यूस कारणीभूत म्हटले आहे. यानंतर नितीनचा भाऊ संजय खुळे याच्या फिर्यादीवरुन संगनमेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातेवाईक आक्रमक
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मात्र आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. नातेवाईकांनी पोलीस निरीक्षकांना तसे निवेदन दिले आहे. आरोपींविरोधात भारतीय दंड संहिता 306, 504, 506, 34 प्रमाणे दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते हे करत आहे.