सांगली : जुन्या वादातून एका 22 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना सांगलीतील मिरज तालुक्यात घडली आहे. या हत्येमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. आकाश माणिक नरुटे असे हत्या करण्यात आलेल्या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. आकाश हा पैलवान असून, तो भावासोबत शेती करत होता. निवडणूक प्रचारातून बोलावून नेत तरुणावर हल्ला करत त्याला संपवले.
सोनी गावात ग्रामपंचायत निवडणुकीची धूमधाम सुरु आहे. आकाश नरुटे हा तरुणही राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात दंग होता. काल निवडणूक प्रचारात असलेल्या आकाशला दोघांनी बोलावून दुचाकीवरुन नेले.
यानंतर आकाशचा मोबाईल बंद येत होता. घरच्यांनी मोबाईल बंद येत असल्याने त्याची शोधाशोध सुरु केली. उशिरापर्यंत त्याचा शोध घेतल्यानंतर मध्यरात्री गावाजवळ करोली रस्त्यावर असलेल्या इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आकाश याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला.
आकाश याच्या डोक्यात पाठिमागील बाजूस आणि पाठिवर धारदार हत्याराने अनेक वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. भावासोबत शेती करणारा आकाश हा पैलवान होता. त्याचे काही दिवसांपूर्वी गावातील काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे.
आकाश यास दुचाकीवर बसवून नेणारे दोघे जण फरारी असून त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी गावातील काही जणांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.
सोनीत ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिनकर पाटील विरुद्ध भाजपचे राजू माळी यांच्यात लढत आहे. राष्ट्रवादीचे दिनकर पाटील समर्थक आकाश नरोटे या तरुणाच्या खूनाच्या घटनेमुळे पोलिसांची धावपळ उडाली होती.