चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील नागपूर मार्ग आता अपघाताचे कारण ठरत आहे. आज सकाळी झालेल्या एका अपघातात स्पोर्ट्स बाईक स्वार युवकांनी वळण घेत असलेल्या बसला थेट धडक दिली. स्थानिक विश्रामगृहासमोर झालेल्या या अपघातात चंद्रपूरकर रहिवासी असलेले दोन युवक गंभीर जखमी झाले. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बस शहराकडे वळसा घेत होती. मात्र अतिवेगात असलेल्या बाईक स्वरांनी नियंत्रण गमावले आणि हा अपघात झाला. या भागात असलेल्या रहिवाशांनी तातडीने जखमी युवकांना मदत केली. या दोन्ही युवकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चंद्रपूर नागपूर मार्गाचा हा भाग मजबुतीकरण व सौंदर्यीकरण केल्यानंतर रुंद झाला आहे. यामुळे या रस्त्यावर भरधाव वेगात बाईक चालवण्याची जणू स्पर्धाच असते. अतिवेगाच्या नादात हा अपघात झाला. रामनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
युवकांच्या हातात स्पोर्ट्स बाईक आल्यात. काही नव्या कोऱ्या गाड्या सुसाट असतात. रस्ते चकाचक झाले आहेत. त्यामुळे वेगावर कधीकधी नियंत्रण राहत नाही. अशी घटना चंद्रपुरात घडली. दोन युवक स्पोर्ट्स बाईकवर बसले. रस्ता चकाचक होता. त्यामुळे वेगाचा मोह त्यांना काही आवरता आला नाही. त्यांनी सुसाट वेगाने स्पोर्ट्स बाईक सुरू ठेवली. वळण आलं. पण, त्यांना त्याचा भानचं राहिलं नाही. त्यामुळे बाईक थेट समोरून येणाऱ्या बसखाली शिरली. यात बाईक चक्काचूर झाली. दोन्ही युवक जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शी म्हणतात, बाईक सुसाट असल्याने हा अपघात झाला. दोन्ही जखमी युवकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार होतील. ते बरेही होतील. पण, अशाप्रकारे सुसाट बाईक चालवल्यास त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात, याची त्यांना जाणीव झाली आहे. त्यामुळे बाईक चालवताना सावधान असं म्हणण्याची वेळ आली आहे.