व-हाडी जीपमध्ये बसून लग्नाला जात होते, ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरशी टक्कर झाली, आणि नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू
लग्नघरात लग्नाची तयारी जोरात सुरू असताना नवरदेवाच्या जिपला मोठा अपघात झाल्याचे वृत्त आले आणि घराचा सारा माहोलच बदलला..
लखनऊ : लग्नघरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. नवरदेव सजून धजून लग्नाला बोलेरो जिपमध्ये बसून लग्नस्थळी जात होते. त्यावेळी भरधाव बोलेरा चालकाचे नियंत्रण सुटले आणि जिप ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरला धडकली. आणि या भीषण टकरीत नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाल्याने लग्न घरात सन्नाटा पसरला. उत्तर प्रदेशातील हरदाई जिल्ह्यात शुक्रवारी हा भयानक अपघात घडला. या घटनेतील आणखी तिघा जखमींवर उपचार सुरू असून त्यांची हालत गंभीर असल्याचे म्हटले जात आहे.
हरपालपुरच्या कुहडा गावचे देवेश यांचे शुक्रवारी लग्न होते. बोलेरो जिपमधून सर्व व-हाडी सजूनधजून शाहजहापुरातील कांट थाना क्षेत्रातील अभायन गावात जात होते. त्यावेळी पचदेवरा क्षेत्रातील दरियाबाद गावाजवळ नवरदेवाच्या जिपच्या चालकाचे नियंत्रण चुकले आणि ती वेगाने एका ऊसाच्या ट्रॅक्टरवर आदळली. त्यामुळे जिप ओढ्यात कोसळली. त्यामुळे बोलेरोतील आठजण गंभीर जखमी झाले.
या भीषण अपघातात 12 वर्षीय रूद्र आणि नवरदेवाचा मेहूणा बिपनेस यांचा जागीच मृत्यू झाला तर दवाखान्यात नेत असतानाच नवदेव देवेश ( 20 ) , त्याचे वडील ओमवीर आणि चालक सुमित सिंह या तिघांचा अशा एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याने लग्न घराचा माहोलच बदलला. तसेच बोलेरामध्ये बसलेल्या अंकीत, राजेश,जगतपाल यांच्यावर फरूखाबाद येथे उपचार सुरू आहे. तिघा जखमींची हालत गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. घटनेचे वृत्त समजताच घटनास्थळी पोलीसांनी धाव घेतली. शाहाबादचे सीओ हेमंत उपाध्याय आणि पचदेवरा ठाणाध्यक्ष गंगाप्रसाद यादव पोलिसांच्या ताफ्यासोबत पोहचले. पोलिसांनी या घटनेत नवरदेवासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.